Neera River Ghat : लाखो वारकऱ्यांचा जीव टांगणीला? नीरा स्नानासाठी सुरक्षित घाट कधी; नेत्यांच्या हालचाली सुरू
Neera River Ghat : पालखी सोहळ्यातील महत्त्वाच्या 'नीरा स्नाना'साठी भाविकांची मोठी गर्दी होते, मात्र घाटाअभावी वारकऱ्यांची सुरक्षितता धोक्यात.

Neera River Ghat – पुरंदर तालुक्यातील नीरा नदीच्या पवित्र काठावर दरवर्षी वारकऱ्यांच्या श्रद्धेचा महासागर उसळत असतो. माउलींच्या स्नानामुळे नीरा परिसराला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. नीरा नदीच्या पवित्र जलामध्ये लाखो भाविक स्नान करीत असतात. यावेळी मोठी गर्दी नदीपात्रात होत असते. मात्र, वारकऱ्यांची सुरक्षामात्र वाऱ्यावर सोडली जाते. या वर्षी देखील लाखो भाविक या नदी पत्रात स्नान करणार आहेत.
शासन या वारकऱ्यांच्या सुरक्षेबाबत दुर्लक्ष करताना दिसत आहे. त्यामुळे नीरा पात्रात सुरक्षित आणि सुसज्ज घाट उभारण्याची मागणी आता तीव्र झाली आहे. नीरा आणि पाडेगाव येथे दरवर्षी हजारो पुरुष व महिला भाविक मोठ्या भक्तिभावाने स्नान करतात. मात्र, सुरक्षित घाट नसल्याने पाण्यात उतरताना होणाऱ्या अडचणी, गर्दीमुळे निर्माण होणारे धोके आणि आवश्यक सोयींचा अभाव आदी कारणांमुळे भाविकांना त्रास सहन करावा लागतो.
अनेक वेळा परिस्थितीमुळे अपघाताचा धोका वाढतो, वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या जात आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेचा विचार करता, नीरा नदीवर सुस्थितीत घाट उभारणे ही केवळ गरज नसून अत्यावश्यक बाब बनली आहे. याच पार्श्वभूमीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती पुढे येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कामासाठी हालचाली सुरू आहेत. भाजपचे प्रदेश विस्तारक योगेंद्र माने यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा विषय शासन दरबारी प्राधान्याने घेतला जात आहे.
शासनस्तरावर सकारात्मक कार्यवाही
सध्या शासन स्तरावर प्रस्तावावर सकारात्मक कार्यवाही सुरू असून, लवकरच नीरा व पाडेगाव येथे सुरक्षित आणि सुसज्ज घाट मंजूर होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ही मागणी केवळ विकासकामापुरती मर्यादित नसून, लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धा, भावना, परंपरेशी निगडित आहे. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वारकरी परंपरेच्या जतनासाठी हा घाट लवकर साकार व्हावा, अशी मागणी वाराकऱ्यांकडून होत आहे. स्थानिकांकडून मागणी जोर धरत आहे.
“नीरा येथे माऊली येतात. तेव्हा लाखो वारकरी नीरा स्नान करीत असतात. मात्र, या सर्वांना सुविधा पुरवणे ग्रामपंचायतीला शक्य नाही. त्यामुळे शासनाच्या वतीने नीरा नदी काठावर मोठा घाट बांधणे आवश्यक आहे. याठिकाणी मोठी विस्तृत जागा उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे अनेक सुविधा निर्माण करणे शक्य होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. त्याला तत्वतः मंजुरी मिळाली आहे. पण त्यावर पुढील कार्यवाही तातडीने होणे आवश्यक आहे.”
– राजेश काकडे, उपसरपंच, नीरा.






