Neelam Gorhe | Sushma Andhare : दिल्लीत भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर दोन मर्सिडीज घेऊन पदं मिळत असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्याच आरोपांवरून आता राजकीय वर्तुळात आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. नीलम गोऱ्हेंनी केलेल्या आरोपांचा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. तसेच सुषमा अंधारेंनी निलम गोऱ्हे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा देखील दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे. माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, “नीलम गोऱ्हेंना ज्या पक्षानी चार वेळा आमदारकी दिली. त्यांनी त्यांच्या मॉडेल कॉलनीतील भागात शिवसेनेती एक साधी शाखाही उघडली नाही. त्यांनी माझा शिवसेनेत पक्षप्रवेश होऊ दिला नाही. माझा पक्षप्रवेश होईपर्यंत नीलम गोऱ्हेंच्या कानावर पडू दिलं नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. तसेच पक्षात कुणाला प्रवेश द्यायचा हे सगळं काम नीलम गोऱ्हे बघायच्या… नीलम गोऱ्हेंनी आमदारकीसाठी मर्सिडीज दिल्या तर त्या कुठून आणल्या? नीलम गोऱ्हेंचा व्यवसाय काय, की त्यांची अडीचशे कोटींची संपत्ती आहे?, असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या कामाची सुरुवात करताना एसएफआयमधून केली. त्यानंतर भारिपमध्ये उडी मारली. प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे त्यांना ओळख मिळाली. ईमानदारी, प्रामाणिकपणा त्यांच्या शब्दकोशात नाही. प्रकाश आंबेडकर यांच्याशी त्यांनी बेइमानी केली. तसेच शरद पवारांकडे आणि त्यांच्या पक्षाशी बेईमानी केली मग त्या आमच्याकडे आल्या. त्या जिथे राहतात त्यांनी एक शाखा उभी केली नाही, लोकांना कसे बाजूला ठेवता येईल हे त्यांनी केलं, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. अब्रू नुकसानीचा दावा…. त्या पुढे म्हणाल्या, गोऱ्हे यांच्यासारखा व्यक्तीला पैशाची कदर नाही. त्यांनी अनेक पदं भूषवली म्हणजे अनेक मर्सिडीजचे किंमत त्यात होती. मी आज नीलम गोऱ्हेंवर हा अब्रू नुकसानीचा दावा किती असेल, त्याची रक्कम किती असेल हे संध्याकाळपर्यंत कळवले जाईल, असंही सुषमा अंधारेंनी सांगितले. नेमकं काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे? कार्यकर्त्यांना कमी समजण्याचे कारण नाही. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसे आणली जायची. गल्ला गोळा करण्याचे काम एकनाथ शिंदेंना दिले होते, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीझ दिल्या की पदे मिळायची, असा खळबळजनक आरोप देखील नीलम गोऱ्हे यांनी या मुलाखतीत बोलताना केला. तसेच ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांनाच आम्ही नको झालो होतो, असा दावाही नीलम गोऱ्हे यांनी केला. संपादक राजीव खांडेकर आणि पत्रकार प्रविण बर्दापूरकर यांनी नीलम गोऱ्हे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत बोलताना नीलम गोऱ्हे यांनी उपरोक्त गौप्यस्फोट केला. बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचे सगळीकडे लक्ष होते, मात्र त्यानंतर त्यात खूप बदल होत गेले. 2019 ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्हालाही खूप धन्य वाटले. बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे कारण होते. मात्र आमदारांना भेटी मिळणार नाहीत. कुठल्याही विषयावर भेट नाही. या सर्व गोष्टीचा विचार केला स्थित्यंतरे होण्यामागे बरीच कारणे असतात. त्यावर वेगळी चर्चा करायला जरूर माझी तयारी आहे, असे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.