कन्नड भाषा अनिवार्य करण्याची गरज; बंगळुरू मेट्रोला आदेश दिल्याने भरतीची जाहिरात रद्द !

बेंगळुरू – भाषेबद्दलचा अभिमान पुन्हा एकदा दिसला तो कर्नाटकमध्ये. बंगळुरू मेट्रो रेल महामंडळाने काढलेली एक वादग्रस्त जाहिरात कर्नाटक सरकारने मागे घेण्यास भाग पाडले आहे. बंगळुरूच्या नम्मा मेट्रोमध्ये ५० लोको ऑपरेटरची जाहिरात देण्यात आली होती.
उमेदवारांना कन्नड भाषेचे ज्ञान आवश्यक नसल्याचे यात म्हटले होते. कन्नड संघटनांनी यावर टीका केल्यानंतर ही भरती रद्द करण्यात आली आहे. १२ मार्च रोजी सदर जाहिरात प्रसिद्ध झाली होती. नोकरीला लागल्यानंतर एका वर्षाच्या आत कन्नड भाषा आत्मसात करण्याची अट जाहिरातीमध्ये ठेवली गेली होती.
कन्नड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष पुरुषोत्तम बिलिमाले, कन्नड भाषिक विविध संघटना यांनी या जाहिरातीमधील अटीवर जोरदार आक्षेप घेतला. या जाहिरातीमुळे स्थानिक भूमिपूत्रांवर अन्याय होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच बंगळुरू मेट्रो रेल स्थानिक कन्नडीगांना डावलून बाहेरील राज्यातील उमेदवारांना नोकरीसाठी प्राधान्य देत असल्याचा आरोपही करण्यात आला.
कन्नड भाषेविषयीच्या या वादात आता कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी बंगळुरू मेट्रो रेल महामंडळाला सदर जाहिरात मागे घेण्याचे आदेश दिले. ते म्हणाले, बीएमआरसीएलने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या लोको पायलट्सच्या जाहिरातमीध्ये किमान ३ वर्षांचा अनुभवाची अट ठेवली गेली होती.
ही जाहिरात मागे घेण्यासंबंधी बीएमआरसीएलच्या व्यवस्थापकांना आदेश दिले असून नोकर भरतीसंदर्भात राज्य सरकारच्या नियमावलीचे पालन करण्याची सूचना दिली आहे. पारदर्शक आणि न्याय प्रतिनिधित्व मिळावे आणि कन्नडिगांचे हक्क आणि अधिकार अबाधित राहावेत, यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे.





