नवी दिल्ली – दहशतवादाला रोखण्यासाठी दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांचे अर्थसहाय्य रोखायला पाहिजे, या मुद्यावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी भर दिला आहे. भारत आणि मध्य आशियातील देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी सीमेपलिकडील दहशतवाद, दहशतवादाचे अर्थकारण आणि कट्टरतावादाला पाठिंबा देणाऱ्या सर्व छुप्या घटकांविरोधात सर्वसमावेशक कृतीच्या आवश्यकतेवर भर दिला. अफगाणिस्तानला दहशतवादी कृत्यांसाठीचे सुरक्षित आश्रय स्थान बनू देता कामा नये, यावरही सर्व देशांच्या “एनएसए’नी भर दिला. चीनच्या बेल्ट ऍन्ड रोड इनिशिएटिव्हबाबत सर्व देशांच्या भौगोलिक एकात्मता आणि सार्वभौमत्वाबद्दल आदर आणि पारदर्शकतेच्या तत्वावर आधारलेली संलग्नता आवश्यक असल्याची भारताची भूमिका आहे, असे परिषदेच्या समारोप प्रसंगी प्रसिद्धीस देण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे. संलग्नतेच्या मुद्याला भारताचे प्राधान्य आहे. यासाठी भारत गुंतवणूक आणि सहकार्य करायला तयार असल्याचे डोवाल यांनी आपल्या भाषणात सांगितले. अर्थसहाय्यात दहशतवादाचा प्राण आहे. हे अर्थसहाय्य रोखण्यासाठी सर्वाधिक प्राधान्य दिले जायला हवे. मध्य आशिया हा भाग भारताचा विस्तारीत शेजारी भाग आहे. अफगाणिस्तानमधील परिस्थिती आपल्या सर्वांसाठी चिंतेचे कारण आहे, असेही डोवाल म्हणाले. Lakhimpur violence case : शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याप्रकरणी आशिष मिश्रावर हत्येचा खटला चालणार दहशतवादी गटांमधील भरती, अर्थसहाय्य, दहशतवादी विचारांचा प्रसार आदी गोष्टींचा फार गंभीर परिणाम प्रादेशित स्थितीवर होत असून याविरोधातील सर्वसमावेशक कृती आणि समन्वयाच्या कारवाईवर या परिषदेमध्ये विचार करण्यात आला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या या परिषदेला भारत, कझाकस्तान, किरगीझस्तान, ताजिकीस्तान आणि उझबेकीस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार उपस्थित होते. तर तुर्कमेनिस्तानचे भारतातील राजदूत या परिषदेला उपस्थित होते.