Anish Dayal Singh : निवृत्त IPS अनिश दयाल सिंह यांची उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती

नवी दिल्ली : निवृत्त आयपीएस अधिकारी अनिश दयाल सिंह यांची उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नेतृत्वाखालील टीमचा भाग बनणार आहेत. सिंह यांच्याकडे देशांतर्गत बाबींचा प्रभार असेल. डोवाल यांच्या टीममध्ये सध्या इतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
राजिंदर खन्ना हे अतिरिक्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. तर, टी.व्ही.रविचंद्रन आणि पवन कपूर उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. आता त्या टीममध्ये सिंह हेही सहभागी होणार आहेत. ते प्रामुख्याने जम्मू-काश्मीर, नक्षलवाद आणि ईशान्येकडील बंडखोरीशी संबंधित बाबी हाताळतील.
भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) १९८८ च्या तुकडीतील मणिपूर केडरचे अधिकारी असणारे सिंह डिसेंबर २०२४ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्याआधी त्यांनी अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यांनी प्रदीर्घ काळ गुप्तचर विभागात (आयबी) कार्य केले. त्यानंतर भारत-तिबेट सीमा पोलीस दल (आयटीबीपी) आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) प्रमुखपदाची धुरा त्यांनी सांभाळली.





