‘एनडीए’ मंत्रिमंडळ नव्हे; परिवार मंडळ’; राहुल गांधींचा जोरदार पलटवार

नवी दिल्ली – घराणेशाहीच्या मुद्द्यावरून विरोधकांवर टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी जोरदार पलटवार केला. त्यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झालेल्या मंत्र्यांचा संदर्भ दिला. केंद्रात एनडीएचे मंत्रिमंडळ नसून परिवार मंडळ आहे. वागण्या-बोलण्यातील फरकाला मोदी म्हणतात, असे उपहासात्मक भाष्य त्यांनी केले.
सलग तिसरा कार्यकाळ मिळालेल्या मोदींचे मंत्रिमंडळ नुकतेच स्थापन झाले. मंत्रिमंडळात समावेश झालेले अनेक मंत्री राजकीय घराण्यांमधील असल्याकडे लक्ष वेधणारी पोस्ट राहुल यांनी सोशल मीडियावरून प्रसिद्ध केली. तसेच, मोदींवर निशाणा साधला. अनेक पिढ्यांचा संघर्ष, त्यांची सेवा अन् त्यांच्या बलिदानाच्या परंपरेला घराणेशाही म्हणणारे आपल्या सरकारी परिवाराला सत्तेचे इच्छापत्र वाटत आहेत, अशी टिप्पणी त्यांनी केली. राजकीय घराण्यांचे सदस्य असणाऱ्या २० केंद्रीय मंत्र्यांची यादीच राहुल यांनी सादर केली. ते कुणाचे नातेवाईक आहेत याचा उल्लेखही त्यांनी केला.
राहुल यांनी नमूद केलेल्या प्रमुख केंद्रीय मंत्र्यांमध्ये जे.पी.नड्डा, एच.डी.कुमारस्वामी, ज्योतिरादित्य शिंदे, जयंत चौधरी, पियू्ष गोयल, धर्मेंद्र प्रधान, रक्षा खडसे, चिराग पासवान, किरेन रिजीजू आदींचा समावेश आहे.
कुमारस्वामी हे माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा, शिंदे हे माजी केंद्रीय मंत्री माधवराव शिंदे, गोयल हे माजी केंद्रीय मंत्री वेदप्रकाश गोयल, तर चिराग हे माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पुत्र आहेत. नड्डा यांच्या सासू जयश्री बॅनर्जी या मध्यप्रदेशच्या माजी मंत्री होत्या. माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांचे चौधरी नातू आहेत. प्रधान हे माजी केंद्रीय मंत्री देबेंद्र प्रधान, तर रिजीजू हे अरूणाचल प्रदेशातील नेते रिनचिन खारू यांचे पुत्र आहेत. महाराष्ट्राचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या रक्षा खडसे या सूनबाई आहेत.
राहुल यांच्या यादीत रामनाथ ठाकूर, राममोहन नायडू, जितीन प्रसाद, राव इंदरजित सिंह, रवनितसिंग बिट्टू, अनुप्रिया पटेल, किर्तीवर्धन सिंह, कमलेश पासवान, शांतनू ठाकूर, विरेंद्रकुमार खटीक आणि अन्नपुर्णा देवी या केंद्रीय मंत्र्यांच्या नावांचाही समावेश आहे.





