NCRA Pune: अवकाशात दडलंय काय? पुण्याच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले ५ रहस्यमयी तारे; नासाही चक्रावली
NCRA Pune: भारतासह ४ देशांच्या शास्त्रज्ञांना मोठे यश; ताऱ्यांच्या परस्परसंवादाचा आणि गुरुत्वाकर्षणाच्या नियमांचा अभ्यास करण्यासाठी मिळणार नवी दिशा.

NCRA Pune – नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स (एनसीआरए) च्या संशोधकांनी अपग्रेडेड जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (युजीएमआरटी)च्या मदतीने आकाशगंगेतील दोन प्राचीन वर्तुळाकार तारासमूहांमध्ये पाच नवीन मिलिसेकंद पल्सरचा (स्पंदतारे) शोध लावला आहे. ‘मेसियर ६९’ (एम६९) आणि ‘मेसियर ७०’ (एम७०) या तारासमूहांमध्ये प्रथमच पल्सर आढळल्याने आकाशगंगेतील सर्वांत जुन्या, दाट तारासमूहांच्या अभ्यासाला नवी दिशा मिळणार आहे.
एम६९ मध्ये दोन आणि एम७०मध्ये तीन असे एकूण पाच पल्सर सापडले असून त्यापैकी एम६९ए हा पल्सर एका पांढऱ्या बटू ताऱ्यासोबत जोडला असून दोन्ही तारे काही दिवसांत एकमेकांभोवती प्रदक्षिणा पूर्ण करतात. काही पल्सर मात्र स्वतंत्र अवस्थेत आढळल्याने दाट तारासमूहांमध्ये होणाऱ्या ताऱ्यांच्या परस्परसंवादाबाबत नवी माहिती मिळण्याची शक्यता आहे. एनसीआरएमधील विद्यावाचस्पतीचे विद्यार्थी ज्योतिर्मय दास यांच्या नेतृत्वाखाली हा शोध लावण्यात आला.
भारत, जर्मनी, अमेरिका आणि ब्रिटनमधील संशोधकांच्या सहभागातून राबविण्यात येत असलेल्या ग्लोब्युलर क्लस्टर्स जीएमआरटी पल्सर सर्च मोहिमेचा हा भाग आहे. मिलिसेकंद पल्सर (स्पंदतारे) हे अतिशय घनदाट न्यूट्रॉन तारे असून ते सेकंदाला शेकडो वेळा स्वतःभोवती फिरतात. त्यांच्या नियमित रेडिओ लहरींमुळे त्यांना विश्वातील सर्वांत अचूक नैसर्गिक घड्याळांपैकी एक मानले जाते.
गुरुत्वाकर्षणाचे नियम, ताऱ्यांची उत्क्रांती आणि प्राचीन तारासमूहांचे अंतर्गत वातावरण समजून घेण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. या शोधामुळे गोलाकार तारासमूहांमध्ये ज्ञात असलेल्या पल्सरच्या संख्येत भर पडली असून, यापूर्वी पल्सर न सापडलेल्या तारासमूहांमध्येही असे तारे दडलेले असू शकतात, हे स्पष्ट झाले आहे. हजारो प्रकाशवर्षे दूर असलेल्या तारासमूहांचे निरीक्षण युजीएमआरटीच्या उच्च संवेदनशीलतेमुळे शक्य झाले, असे एनसीआरएचे शास्त्रज्ञ्ञ डॉ. जयंत रॉय यांनी सांगितले.





