इस्रोची आणखी एक ऐतिहासिक कामगिरी ; अंतराळात दोन उपग्रहांची केली यशस्वी जोडणी

ISRO SpaDeX । इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेले आहे. इस्रोने त्यांच्या स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट (SpaDeX) अंतर्गत दोन उपग्रहांची अंतराळात जोडणी यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. अंतराळ संस्थेने सोशल मीडियावर पोस्ट करून याची घोषणा केली आहे. इस्रोच्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये, “भारताने अंतराळ इतिहासात आपले नाव नोंदवले आहे. इस्रोच्या स्पाडेक्स मोहिमेला चांगले ऐतिहासिक डॉकिंग यश मिळाले आहे. हा क्षण पाहून अभिमान वाटत आहे.”
मिनीपासून सुमारे ३५० किलोमीटर उंचीवर अंतराळात SpaDeX च्या SpaDeX A आणि SpaDeX B या दोन उपग्रहांची जोडणी करण्यात इस्रोने यश मिळवलं आहे. पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारे हे दोन उपग्रह अचूकरित्या एकमेकांना जोडले गेले. तेव्हा अवकाशात उपग्रहांची, अशा यानांची जोडणी करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. असं तंत्रज्ञान अमेरिका, चीन, रशिया या देशांकडे आहे. इस्रोने ३० डिसेंबर २०२४ रोजी स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट (SpaDeX) मिशन यशस्वीरित्या लाँच केले.
SpaDeX म्हणजे Space Docking Experiment. या मोहिमे अंतर्गत इस्रोने प्रत्येकी २२० किलोग्रॅम वजनाचे SpaDeX A आणि SpaDeX B हे दोन उपग्रह ३० डिसेंबरला श्रीहरिकोटाहून यश्स्वी प्रक्षेपित केले. हे दोन उपग्रह अवकाशात प्रक्षेपित झाल्यावर एकमेकांपासून सुमारे २० किलोमीटर अंतर राखत पृथ्वी प्रदक्षिणा करत होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने यामधील अंतर कमी करण्यात आले. सात आणि नऊ जानेवारीला या उपग्रहांच्या जोडणीसाठी प्रयत्न करण्यात आले. पण काही तांत्रिक कारणांमुळे ही जोडणी पुढे ढकलण्यात आली. अखेर भारतीय वेळेनुसार आज सकाळी दोन उपग्रहांची जोडणी करण्यात यश आल्याचं इस्रोने जाहीर केले.
SpaDeX Docking Update:
🌟Docking Success
Spacecraft docking successfully completed! A historic moment.
Let’s walk through the SpaDeX docking process:
Manoeuvre from 15m to 3m hold point completed. Docking initiated with precision, leading to successful spacecraft capture.…
— ISRO (@isro) January 16, 2025
उपग्रहांच्या जोडणीचे महत्व काय ? ISRO SpaDeX ।
भविष्यात चांद्रयान ४ ही मोहिम आखली जाणार आहे, यात चंद्रावरील माती आणि दगड हे पृथ्वीवर आणले जाणार आहे. एक यान चंद्रावरील माती गोळा करेल आणि ही माती एका कुपीतून चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या दुसऱ्या एका यानाशी जोडत त्या यानाकडे सुपूर्त करेल. आणि मग ते यान ती कुपी पृथ्वीवर आणेल. अशा मोहिमेत अवकाशात दोन यानांची जोडणी होणे आवश्यक आहे आणि याच तंत्रज्ञानाची चाचणी आजच्या SpaDeX मोहिमेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
तसंच २०२८ नंतर भारत स्वतःचे अवकाश स्थानक उभारणार आहे. हे अवकाश स्थानक पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालेल, यात अंतराळवीरांचे वास्तव्य असेल, तिथे विविध प्रयोग आणि तंत्रज्ञानाच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. तेव्हा या अवकाश स्थानकाच्या उभारणीसाठी SpaDeX च्या मोहिमेतून मिळालेल्या अनुभवाचा उपयोग होणार आहे.
हे तंत्रज्ञान आव्हानात्मक का ? ISRO SpaDeX ।
अंतराळात अवकाश यानांची किंवा उपग्रहांची जोडणी करतांना संबंधित यानांचा वेग हा अतिशय जास्त असतो. आज जोडण्यात आलेले SpaDeX A आणि SpaDeX B हे दोन उपग्रह हे सेकंदाला सात किलोमीटर पेक्षा जास्त वेगाने अंतराळात फिरत होते. तेव्हा दोघांमधील अंतर १५ मीटर एवढे सुरुवातीला कमी करण्यात आले. त्यानंतर हे अंतर आणखी कमी करत तीन मीटरपर्यंत आणले. त्यानंतर उपग्रहांवरील सर्व यंत्रणा तपासत ही जोडणी करण्यात आली. अशा या तंत्रज्ञानावर हुकूमत मिळवणं हे अत्यंत आव्हानात्मक आहे. त्यात इस्रोने यश मिळवलं आहे. आता यापुढे SpaDeX A आणि SpaDeX B या दोन्ही उपग्रहातील यंत्रणांची तपासणी केली जाईल आणि परत हे उपग्रह वेगळे केले जातील. पुढील दोन वर्षे ही मोहिम सुरु ठेवण्याचे इस्रोचे नियोजन आहे.
डॉकिंग विंडो २० जानेवारी रोजी बंद होणार
स्पाडेक्स मोहिमेचा चेझर उपग्रह (SDX01) ४.५ किलो प्रणोदक वाहून नेतो, जो दोन डॉकिंग आणि अनडॉकिंगसाठी पुरेसा आहे. तथापि, सध्याची ऑपरेशनल विंडो २० जानेवारी रोजी बंद होईल. यानंतर, पुढील योग्य डॉकिंग विंडो २५ मार्च रोजी उघडेल, ज्यामुळे ६५ दिवसांचा कालावधी शिल्लक राहील.





