Amrita Rao : रेडिओवरून केलं प्रपोज, 7 वर्षे डेटिंग अन् मग लग्न; अमृता रावची भन्नाट लव्ह स्टोरी
Amrita Rao : कार्यक्रमादरम्यान अमृताचे आवडते गाणे वाजवत त्यांनी थेट ऑन-एअर आपल्या प्रेमाची कबुली दिली. या अनपेक्षित प्रपोजलमुळे अमृता आनंदाने भारावून गेली होती.

Amrita Rao : बॉलिवूडमधील साधेपणा, सौंदर्य आणि दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री अमृता राव आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. ‘इश्क विश्क’, ‘मैं हूं ना’ आणि ‘विवाह’सारख्या सुपरहिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अमृताची प्रेमकहाणीही तितकीच खास आणि फिल्मी आहे.
अमृता राव आणि प्रसिद्ध रेडिओ जॉकी आरजे अनमोल यांची पहिली भेट एका रेडिओ मुलाखतीदरम्यान झाली होती. पहिल्याच भेटीत अनमोल अमृताच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर दोघांमधील मैत्री वाढत गेली आणि कालांतराने त्या नात्याचे प्रेमात रूपांतर झाले.
त्यांच्या प्रेमकथेतील सर्वात खास क्षण म्हणजे अनमोलचे रेडिओवरून केलेले प्रपोजल. एका शूटिंगनंतर घरी परतत असलेल्या अमृताला त्यांनी आपला रेडिओ शो ऐकण्यास सांगितले. कार्यक्रमादरम्यान अमृताचे आवडते गाणे वाजवत त्यांनी थेट ऑन-एअर आपल्या प्रेमाची कबुली दिली. या अनपेक्षित प्रपोजलमुळे अमृता आनंदाने भारावून गेली होती.
दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर या जोडीने १५ मे २०१६ रोजी विवाह केला. २०२० मध्ये त्यांच्या आयुष्यात मुलगा वीरचे आगमन झाले आणि त्यांच्या कुटुंबातील आनंद आणखी वाढला.
सध्या अमृता मोठ्या पडद्यापासून काहीशी दूर असली तरी ती मनोरंजनविश्वाशी कायम जोडलेली आहे. पती अनमोलसोबत ती लोकप्रिय पॉडकास्ट सादर करते. तसेच दोघांचे स्वतःचे यूट्यूब चॅनलही आहे, जिथे ते सेलिब्रिटी मुलाखती, वैयक्तिक अनुभव आणि आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करतात.
सोशल मीडियावर सक्रिय असलेली अमृता तिच्या कुटुंबासोबतचे फोटो, दैनंदिन आयुष्यातील अपडेट्स आणि खास आठवणी चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते. अभिनयापासून काहीसे अंतर राखले असले तरी तिच्या साधेपणामुळे आणि सुंदर प्रेमकथेमुळे अमृता राव आजही चाहत्यांच्या मनात विशेष स्थान टिकवून आहे.
हेही वाचा : LPG Cylinder Price : सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले! घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ





