आता शरद पवार करणार UPA चे नेतृत्व? दिल्लीत मोठी घडामोड; प्रस्ताव झाला मंजूर

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांचे नेतृत्व करावे, असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यावेळी पवार देखील बैठकीला उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाला आव्हान द्यायचे असेल तर विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पर्यायी आघाडी उभी करण्यासंबंधी दिल्लीत चर्चा सुरु झाली आहे.
दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीमध्ये शरद पवार यांच्याकडे यूपीएचं अध्यक्षपद सोपवण्याचा ठराव मांडण्यात आला आणि संमतही करण्यात आला. काँग्रेस नेतृत्व करु शकत नाही असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे म्हणणे आहे. सध्या देशात सर्व बिगर-भाजप राजकीय पक्ष आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांना एकत्र आणण्यात शरद पवार हे मोठी भूमिका बजावू शकतात. पवारच देशातील विरोधकांना एकत्र आणू शकतात आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपाला रोखले जाऊ शकते असे या ठरावात म्हटले आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसने ठराव सादर केल्या त्यामध्ये देशातील सध्याची राजकीय स्थिती लक्षात घेता शरद पवार यांनी काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांचे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करायला हवे. पवार हे देशातील सध्याचे सर्वात अनुभवी नेते आहेत. संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री म्हणून त्यांचे देशाच्या विकासातील योगदान मोठे आहे. या सर्व बाबी विचारात घेत त्यांच्याकडे विरोधी पक्षाचे नेतृत्व सोपवायला हवे असे या ठरावात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, देशात झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यातच सत्ता असलेल्या पंजाबलाही काँग्रेसला गमवावे लागले आहे. या निडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाच्या मागणीने जोर धरला होता. आता यातच संयुक्त पुरोगामी आघाडीची जनक असलेल्या काँग्रेसलाच यूपीए अध्यक्षपद सोडण्याची मागणी मित्र पक्ष करताना दिसत आहेत. सध्या यूपीए अध्यक्षपद हे सोनिया गांधी यांच्याकडे आहे. अशातच राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मंजूर केलेल्या प्रस्तावावर काँग्रेस नेते काय प्रतिक्रिया देतील हे पाहावे लागणार आहे.





