NCP Politics : राष्ट्रवादीला मोठा धक्का? ‘या’ महिला नेत्याच्या फेसबुक पोस्टने उडाली खळबळ
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी (NCP Politics) घडताना दिसत आहेत.

NCP Politics : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी (NCP Politics) घडताना दिसत आहेत. एकीकडे शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएसोबत जाण्याची चर्चा रंगली आहे, तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून महायुतीत अर्थमंत्रिपद मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे वृत्त आहे.
या सर्व घडामोडी चालू असतानाच, आता अजित पवार यांच्या गटातून एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. पक्षाच्या आक्रमक नेत्या रुपाली पाटील ठोंबरे या पक्षात नाराज असल्याची (NCP Politics) जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
त्यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून एक अत्यंत सूचक पोस्ट शेअर केली असून, “लवकरच मला मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे,” असे विधान केल्यामुळे त्या आता पक्षबदल करणार का? असा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
“अजितदादा, तुम्ही असताना पक्षात वचक होता…” – रुपाली पाटील
रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या सुरुवातीलाच अजित पवार यांच्याबद्दलचा आदर व्यक्त करत पक्षात सध्या सुरू असलेल्या परिस्थितीवर बोट ठेवले आहे. त्यांनी लिहिले की, “बापमाणूस माननीय अजितदादा मला माफ करा. मी कायम आपल्या ऋणात आहे.
तुम्ही असताना पक्षात अन्याय करणाऱ्यांवर, चाटेगिरी करणाऱ्यांवर, फुशारकी मारत नाहक गोंधळ घालणाऱ्यांवर आणि काटाकटी करणाऱ्या नेत्यांवर तुमचा वचक होता. कार्यकर्त्यांना विनाकारण त्रास देणाऱ्यांवर तुमच्या शब्दाचा धाक होता. काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आणि पदाधिकाऱ्याचे तुम्ही खंबीर आधार होता. तुमच्याच शब्दाचा मान ठेवून आजवर आम्ही अनेकदा शांत राहिलो.”
“अन्याय, दडपशाही सहन करणार नाही
अजित पवारांच्या अनुपस्थितीत पक्षात कशा प्रकारे बदल झाले, यावर तीव्र नाराजी व्यक्त करताना त्यांनी पुढे लिहिले की, “अजितदादा, तुम्ही गेल्यानंतर काही लोकांनी पक्षातील परिस्थिती अधिकच भयावह करून टाकली आहे. प्रामाणिक कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा संयम हा त्यांचा कमकुवतपणा समजण्याची चूक सध्या काही नेत्यांकडून केली जात आहे.
आता यापुढे अन्याय, दडपशाही आणि विश्वासघात कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. म्हणूनच, अजितदादा मला माफ करा; आता मला कठोर भूमिका घ्यावीच लागणार आहे आणि न्यायासाठी दुर्गाकाली रूप धारण करावे लागणार आहे.”
“आम्ही तुमचीच माणसं, पण राजकारण वंगाळ करणाऱ्यांना सोडणार नाही!”
पक्षातील निष्ठावंतांची खदखद बोलून दाखवताना रुपाली पाटील म्हणाल्या की, तुम्ही असताना आणि तुम्ही नसताना पक्षातील वातावरणात किती मोठा फरक पडला आहे, हे आज प्रत्येक निष्ठावान कार्यकर्त्याला प्रकर्षाने जाणवत आहे. मात्र, या परिस्थितीतही आम्ही तुमचीच माणसं होतो, आहोत आणि कायम राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
अजितदादांची शिकवण, त्यांची काम करण्याची पद्धत आणि न्यायासाठी लढण्याची ताकद आपण कधीही सोडणार नाही, असे सांगतानाच त्यांनी, “राजकारण वंगाळ (घाणेरडे) करणाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांवर अन्याय करणाऱ्यांना आता सोडणार नाही,” असा थेट इशारा दिला आहे.
रुपाली पाटील ठोंबरे यांच्या या अत्यंत आक्रमक आणि सूचक फेसबुक पोस्टमुळे (NCP Politics) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षांतर्गत चाललेली धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. त्यामुळे आता येत्या काळात रुपाली पाटील नेमका काय कठोर निर्णय घेतात आणि त्यांची पुढची राजकीय दिशा काय असेल, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.






