‘नकली वाघनखे आणणारे नकली सरकार’ जितेंद्र आव्हाड यांची राज्य सरकारवर टीका

मुंबई : सध्या लंडनहुन महाराष्ट्रात आणल्या जाणाऱ्या वाघनख्यांवरून विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. लंडनमधील वस्तू संग्रहायलयाकडून भाडेतत्वावर आणली जाणारी वाघनखं आता वादात सापडली आहेत. ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरली असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला होता. यानंतर कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी यावर सरकारच्या या दाव्यावर आक्षेप घेतला. इंद्रजित सावंत यांनी केलेल्या या दाव्यामुळे आता शिवप्रेमींसह महाराष्ट्रातील जनतेच्या मनात खळबळ निर्माण झाली. या वादामध्ये आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
वाघनखाच्या वादात जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली असून ते म्हणाले, की 26 सप्टेंबरला जीआर काढला त्यात म्हणतात की ही शिवाजी महाराजांची वाघनखे आहेत. आज मात्र तुम्ही दावा करता आहात की आम्ही असा दावा करत नाही. तुम्ही इतिहासकारांना म्हणता की आम्ही दावा करत नाही. तुम्ही भावनांशी खेळ करत आहात. तुम्हाला लोकांचा वापर करून घ्यायचा आहे. तुम्ही इतका अट्टहास का करता. नकली वाघनखे आणणारे हे नकली सरकार आहे. इंद्रजीत सावंत यांचा अभ्यास आहे, त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला असल्याचे आव्हाड म्हणाले.
तसेच की वाघनखं आणतोय असं जीआरमध्ये लिहिलंय. तर सुधीर मुनगंटीवार ऑन रेकॉर्ड म्हणतात आम्ही असा कुठलाही दावा करत नाही. इंद्रजित सावंत यांच्या अभ्यासाचा विसर त्यांना पडतो. जीआरनध्ये एक म्हणता आणि दुसरीकडे एक बोलता. शिवाजी महाराजांचे मार्केटिंग करत निवडणुका जिंकायाच्या हे प्रयोग अनेकांनी केलेत आणि ते फसलेत. नकली वाघनखं घेऊन येणारं नकली सरकार आहे. म्युझियम म्हणतंय आम्ही दावा करत नाही. शिवाजी महाराज प्रत्येक माणसाच्या हृदयात आहेत. सभागृहात सांगतायत सांगता येत नाही आणि जीआरमध्ये म्हणतात हो. अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.





