NCP Politics: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना मोठा धक्का; बड्या नेत्याचा तडकाफकडी राजीनामा
NCP Politics: राजीनाम्यानंतर आनंद परांजपे यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्टही केली. “मनात अनेक भावना दाटून आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील माझा 14 वर्षाचा प्रवास, सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे....

NCP Politics: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत घडामोडींना पुन्हा एकदा वेग आला असून माजी खासदार तथा राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे सरचिटणीस आनंद परांजपे (Anand paranjape) यांनी पक्षातील सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना त्यांनी राजीनामा पत्र पाठवले असून, हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या चार महिन्यांतच पक्षातील नाराजी उघडपणे समोर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून आधीच पक्षात संभ्रमाचे वातावरण असताना आनंद परांजपे यांच्या राजीनाम्यामुळे गटबाजीच्या चर्चांना अधिक खतपाणी मिळाले आहे. (NCP Politics)
राजीनाम्यानंतर परांजपे संपर्काबाहेर – (NCP Politics)
आनंद परांजपे यांनी सरचिटणीस पद, महाराष्ट्र प्रदेश समन्वयक (ठाणे-पालघर), प्रदेश प्रवक्ता पद तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. विधान परिषद उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, राजीनाम्यानंतर परांजपे संपर्काबाहेर असल्याचे सांगितले जात आहे.

NCP Politics: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना मोठा धक्का; बड्या नेत्याचा तडकाफकडी राजीनामा
काही दिवसांपूर्वी आनंद परांजपे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर पक्षातील वरिष्ठांकडून त्यांना जाब विचारण्यात आला होता. त्यानंतर पक्षात त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना निर्माण झाल्याचे बोलले जात होते. याच नाराजीमधून त्यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकल्याची चर्चा रंगली आहे.
उमेदवारी न दिल्याने परांजपे नाराज – (NCP Politics)
राज्यसभा आणि विधान परिषद उमेदवारीसाठी इच्छुक असूनही पक्षाने त्यांना संधी दिली नाही. विधान परिषदेसाठी त्यांचे नाव चर्चेत असतानाही पक्षाने झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी दिल्याने परांजपे नाराज असल्याचे सांगितले जात आहे.
राजीनाम्यानंतर आनंद परांजपे यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्टही केली. “मनात अनेक भावना दाटून आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील माझा 14 वर्षाचा प्रवास, सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मिळालेले प्रेम आणि विश्वास कायम स्मरणात राहील. आज अत्यंत जड अंतःकरणाने हा प्रवास इथेच संपवून नव्या वाटेवर पाऊल टाकून नवीन प्रवासाची सुरुवात करीत आहे..!”, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार(Ajit Pawar) गटात अंतर्गत वाद सुरू असल्याचे विधान केले होते. त्यानंतर आता आनंद परांजपे यांच्या राजीनाम्यामुळे पक्षात सर्व काही आलबेल नसल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.





