नसरापूर प्रतिनिधी | भोर भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर झालेल्या पाशवी अत्याचार व हत्येच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी नसरापूर ग्रामपंचायत सदस्यांसह स्थानिक नागरिकांनी आमदार दिलीप (मामा) लांडे यांच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनामध्ये आरोपी भीमराव कांबळे याला तात्काळ फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, तसेच या प्रकरणाची जलदगतीने आणि काटेकोर चौकशी करून पीडितेला न्याय मिळवून द्यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली. “आमच्या गावातच इतका भीषण प्रकार घडल्याने सर्वसामान्य नागरिक भयभीत झाले असून महिलांमध्ये आणि पालकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. अशा विकृत प्रवृत्तीच्या आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अन्यथा समाजात चुकीचा संदेश जाईल,” असे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले. ग्रामस्थांनी पुढे असेही सांगितले की, संबंधित आरोपीला यापूर्वी दोनदा शिक्षा होऊनही अल्पावधीत सुटका झाल्याने त्याची हिंमत वाढली आणि त्याने पुन्हा असे घृणास्पद कृत्य केले. त्यामुळे यावेळी त्याच्यावर कायमस्वरूपी आणि कठोर कारवाई करून कोणत्याही कायदेशीर पळवाटेतून सुटू दिले जाऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामस्थांच्या भावना समजून घेत त्यांना आश्वस्त केले. त्यांनी सांगितले की, या प्रकरणाबाबत सरकार अत्यंत गंभीर असून त्यांनी याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. “आरोपीविरुद्ध सर्व भक्कम पुरावे गोळा करून लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच तो कोणत्याही परिस्थितीत वय किंवा मानसिक कारणे दाखवून सुटणार नाही, यासाठी विशेष दक्षता घेतली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. या खटल्यासाठी पुण्यातील अनुभवी आणि निष्णात वकिलांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, अशा प्रकारचे गंभीर गुन्हे हाताळण्यात त्यांना विशेष अनुभव आहे, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय या प्रकरणावर दररोज उच्चस्तरीय पातळीवर लक्ष ठेवले जात असून पोलीस महासंचालकांकडून नियमित आढावा घेतला जात आहे. पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी विशेष फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्यासाठीही सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, या भेटीवेळी नसरापूरमधील अनिल गयावळ, प्रसन्न गयावळ, योगेश जंगम, माऊली शेटे यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते. गावकऱ्यांनी एकमुखाने “पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे” अशी भूमिका मांडत सरकारकडून तातडीने ठोस कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे. हेही वाचा : Khichdi Recipe: “उन्हाळ्यात पोट बिघडलं तर काय खाल? ‘अशा’ पद्धतीने केलेली खिचडी देईल झटपट आराम!”