Navratri Special: पिंपरी-चिंचवडच्या स्वच्छतेचा कणा! १ हजार ६९० महिला कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर शहराच्या स्वच्छतेची धुरा
Navratri Special: नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या १ हजार ६९० कष्टकरी महिला कर्मचाऱ्यांच्या कर्तृत्वाला सलाम.

Navratri Special- शहराच्या रस्त्यांवर पडलेला कचरा उचलण्यापासून ते सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखण्यापर्यंत प्रत्येक कामात महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरत आहे. शहरातील नागरिकांना स्वच्छ आणि सुंदर परिसर मिळावा, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागातील तब्बल १ हजार ६९० महिला कर्मचारी दररोज मेहनत घेत आहेत.
उन्हाची तमा नाही, पावसाची पर्वा नाही आणि कामाच्या वेळेची मर्यादाही नाही. शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलणाऱ्या या महिला खऱ्या अर्थाने स्वच्छता व्यवस्थेचा कणा बनल्या आहेत. नवरात्रोत्सवात आदिशक्तीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. मात्र, समाजाच्या दैनंदिन जीवनात आपल्या कर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलाही तितक्याच पूजनीय आहेत.
पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ ठेवण्यासाठी झटणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचे कार्य हे याचेच जिवंत उदाहरण आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागात आस्थापना आणि ठेकेदारामार्फत कार्यरत असलेल्या या महिला रस्ते स्वच्छता, कचरा संकलन आणि शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेची कामे करतात.
नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या कामात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शहरातील रस्ते, चौक आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी त्या नियमितपणे कार्यरत असतात. शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी केवळ प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित नाही. त्यामागे नियोजन, देखरेख आणि कामाचे व्यवस्थापनही तितकेच महत्त्वाचे असते.
महापालिकेच्या आरोग्य विभागात सात महिला स्वच्छता निरीक्षक आणि ११ महिला मुकादम या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामाचे नियोजन, कामावर देखरेख आणि दैनंदिन स्वच्छता व्यवस्थेच्या अंमलबजावणीत त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरते.
स्वच्छ शहराची ओळख निर्माण करताना या महिला कर्मचाऱ्यांच्या श्रमांचा मोठा वाटा असतो. नागरिक घरातून बाहेर पडतात, तेव्हा स्वच्छ रस्ते आणि परिसर दिसण्यामागे या महिलांचे कष्ट असतात. मात्र, त्यांच्या कामाची दखल अनेकदा घेतली जात नाही. शहराच्या सौंदर्याइतकेच या हातांचे योगदानही महत्त्वाचे आहे, याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे.
“नवरात्रातील देवीशक्तीचा जागर करताना या कष्टकरी महिलांच्या जिद्दीचाही गौरव व्हायला हवा. घराची जबाबदारी सांभाळत किंवा विविध कौटुंबिक अडचणींवर मात करत शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या या महिला आपल्या कर्तृत्वातून समाजासमोर आदर्श निर्माण करत आहेत. त्यांच्या या कामामुळे आपले शहर स्वच्छ होत आहे.”
– प्रदीप ठेंगल, उपायुक्त, आरोग्य विभाग.






