Pimpri-Chinchwad: चासकमानही हातातून जाणार? स्थानिकांचा पिंपरी-चिंचवडला पाणी देण्यास विरोध
Pimpri-Chinchwad: भविष्यातील पाणीपुरवठ्यावर प्रश्नचिन्ह

– प्रकाश गायकर
पिंपरी : वाढत्या लोकसंख्येमुळे भविष्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी नवीन जलस्रोतांचा शोध घेत असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर आणखी एक अडचण उभी राहिली आहे. शहराला चासकमान धरणातून पाणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच, धरण परिसरातील स्थानिकांकडून शहराला पाणी देण्यास विरोध होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चासकमानचा पर्यायही अनिश्चित होण्याची चिन्हे आहेत.
पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारा नागरी विस्तार आणि नव्याने विकसित होणाऱ्या भागांमुळे शहराची पाण्याची गरज सातत्याने वाढत आहे. सध्या शहराला प्रामुख्याने पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. आंद्रा आणि भामा-आसखेड योजनेतूनही पाणी उपलब्ध होणार आहे. त्यापैकी आंद्रा धरणातील पाणी इंद्रायणी नदीमधून निघोजे येथील बंधाऱ्यातून थेट उचलले जाते. तर भामा आसखडेच्या बंद पाइपलाइनचे काम सुरू आहे. मात्र, भविष्यातील गरज लक्षात घेता सध्याचे स्रोत पुरेसे ठरणार नसल्याचे महापालिका प्रशासनाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी महापालिकेकडून चासकमान धरणातून पाणी आणण्याच्या पर्यायाचा विचार सुरू आहे. महापालिका प्रशासनाने चासकमान धरणातून पाणी आणण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेला चासकमान धरणातून पाणी आरक्षण अद्याप मंजूर झालेले नाही. त्यामुळे हा पर्याय प्रत्यक्षात आणण्यासाठी शासनस्तरावरील मंजुरीबरोबरच स्थानिक पातळीवरील सहमती मिळविण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.
चासकमान धरणातील पाण्यावर स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांचाही हक्क असल्याची भूमिका यापूर्वी विविध प्रसंगी मांडण्यात आली आहे. धरणासाठी जमिनी देऊनही स्थानिकांना अपेक्षित पाणी मिळत नसल्याची भावना खेड तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आहे. चासकमानचे पाणी अन्य भागांकडे वळविण्याबाबत स्थानिक पातळीवर यापूर्वीही नाराजी व्यक्त झाली आहे. आता पिंपरी-चिंचवडला पाणी देण्याच्या चर्चेला सुरुवात होत असतानाच स्थानिकांकडून विरोधाची भूमिका घेतली जात असल्याने महापालिकेच्या नियोजनासमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. स्थानिकांच्या मागण्या आणि पाणीवाटपाचा प्रश्न सोडविल्याशिवाय चासकमानचा पर्याय पुढे नेणे प्रशासनासाठी सोपे राहणार नाही.
नवा स्रोतही अडचणीत
शहराच्या सध्याच्या पाणीपुरवठ्याचा मोठा आधार पवना धरण आहे. मात्र, वाढत्या शहरासाठी केवळ सध्याच्या जलस्रोतांवर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते. याच पार्श्वभूमीवर पवना बंद जलवाहिनी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे पवना बंद जलवाहिनीचे काम ठप्प आहे. त्यानंतर आता चासकमान नवा आशेचा किरण दिसत असताना त्याला सुरूवातीलाच अडचणींचा सामना करावा लागत आहे.
भविष्यात पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता
पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या आणि बांधकाम क्षेत्राचा विस्तार पाहता येत्या काही वर्षांत पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे प्रत्येक नवीन जलस्रोत हा शहरासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. अशा परिस्थितीत चासकमान धरणातून पाणी मिळण्याची शक्यता स्थानिक विरोधामुळे कमी झाल्यास महापालिकेला पर्यायी स्रोत शोधण्यासाठी पुन्हा मोठी धावपळ करावी लागणार आहे.
एकीकडे शहराचा विस्तार वेगाने होत असताना दुसरीकडे पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक असलेल्या जलस्रोतांबाबत शासनस्तरावरील मंजुरी, स्थानिकांचा विरोध आणि प्रकल्पांची संथ गती अशी आव्हाने कायम आहेत. त्यामुळे चासकमानचा पर्याय देखील हातातून जाणार की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे.





