प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका ही नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ‘मिशन मोड’वर काम केलेच पाहिजे. काम न करणाऱ्या किंवा चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई निश्चित आहे. कितीही मोठा अधिकारी असला, तरी त्याला सूट मिळणार नाही, असा थेट इशारा महापालिका आयुक्त व प्रशासक नवलकिशोर राम यांनी गुरुवारी दिला आहे. कामात कोणी दबाव आणला किंवा विरोध केला, तर तात्काळ माझ्याकडे किंवा पोलिसांकडे तक्रार करा, अशी सूचनाही त्यांनी दिली आहे. महापालिकेकडून सुरू असलेल्या खड्डेमुक्त पुणे मोहिमेत वारजे येथे रस्त्याचे काम निक़ृष्ट केल्याचे समोर आल्यानंतर या प्रकाराची दखल घेत आयुक्त राम यांनी महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले. मात्र, हे निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी करण्यासाठी महापालिका अभियंता संघाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी आयुक्तांची भेट घेतली. याबाबत बोलताना आयुक्त म्हणाले, की अधिकाऱ्यांची नियुक्ती कामासाठीच झाली आहे. निधी असतानाही कामे प्रलंबित ठेवली जात असल्याचे अनेक ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे कारवाई करणे अपरिहार्य ठरते. काही वेळा अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल केले जाते. कोणी काम रोखत असेल, तर तातडीने तक्रार करा; पण कामात कुचराई करू नका, असे आपण अधिकारी, तसेच अभियंता संघाच्या सदस्यांना स्पष्ट केले असल्याचे आयुक्त म्हणाले. वारजेतील दर्जाहीन डांबरीकरणाच्या प्रकरणी परिमंडळ उपायुक्त प्रसाद काटकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली. आयुक्तांचा धसका आणि अभियंते फिल्डवर वारजे प्रकरणानंतर महापालिका आयुक्तांकडून दोन अभियंत्यांना निलंबित केल्यानंतर पथ विभागासह इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धसका घेतला असून, कामाच्या ठिकाणी अभियंते स्वत: उपस्थित राहात असल्याचे चित्र शहरात सुरू असलेल्या अनेक कामांच्या ठिकाणी दिसून आले. याशिवाय एरवी महापालिकेत बसून असलेले अभियंतेही दिवसभर साइट व्हिजिटसाठी गेल्याचे दिसून आले.