Jammu and Kashmir : निसर्ग कोपला.! जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटी; १७ जणांचा मृत्यू
Jammu and Kashmir – देशभरात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे सातत्याने मोठ्या दुर्घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच उत्तराखंड आणि हिमाचलमधील शिमला येथे ढगफुटी झाली होती. त्यानंतर आता जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे ढगफुटीमुळे मोठी जीवीतहानी झाली आहे. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाल्या असून ६५ जणांना वाचविण्यात यश आले आहे.
ही ढगफुटी माचैल माता मंदिराकडे जाणाऱ्या शेवटच्या मोटार चालणाऱ्या गाव चोसीटी येथे दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान घडली. चोसीटी येथून ९,५०० फूट उंचीच्या मंदिरासाठी ८.५ किलोमीटरचा प्रवास सुरू होतो. यावेळी वार्षिक माचैल माता यात्रेसाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. यामुळे ढगफुटीचा फटका भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या लंगरला बसला.
ज्यामुळे अचानक पूर आला आणि दुकाने आणि सुरक्षा चौकीसह अनेक इमारती वाहून गेल्या. या आपत्तीत किमान १७ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच आतापर्यंत ६५ जणांना वाचवण्यात आले आहे. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या अनेक घरांना अचानक आलेल्या पुराचा तडाखा बसला.
या दुर्घटनेची माहिती मिळताच किश्तवारचे उपायुक्त पंकज कुमार शर्मा यांनी तातडीने बचाव पथके तैनात केली आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षकांसह घटनास्थळी धाव घेतली. तसेच उधमपूरहून किश्तवारला एनडीआरएफची दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. या दुर्घटनेनंतर मचैल माता मंदिराची वार्षिक यात्रा स्थगित करण्यात आली आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, आम्हाला पडेरच्या चासोटी भागात ढगफुटी झाल्याचमी माहिती मिळाली आहे. आम्ही किश्तवारचे उपायुक्त पंकज कुमार शर्मा यांच्याशी संपर्क साधला आहे.
तसेच प्रशासनाने तात्काळ कारवाई केली असून बचाव पथके घटनास्थळी उपस्थित आहेत. नुकसानीचे मूल्यांकन केले जात असून आवश्यक बचाव आणि वैद्यकीय व्यवस्थापन व्यवस्था केली जात असून शक्य ती मदत पुरवली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.





