Kishtwar Cloudburst: जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे ढगफुटी, 12 जणांच्या मृत्यूची भीती

किश्तवाड: जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील चशोती परिसरात बुधवारी ढगफुटीची घटना घडली, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेत किमान 10 ते 12 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने तातडीने बचाव आणि मदत कार्य सुरू केले आहे, परंतु खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत. पूरामुळे अनेकजण दुर्गम भागात अडकल्याची माहिती आहे, तसेच मोठ्या प्रमाणात नुकसान आणि जीवितहानीची भीती व्यक्त केली जात आहे.
मचैल माता यात्रेदरम्यान घडली घटना –
ही दुर्घटना मचैल माता तीर्थयात्रेदरम्यान घडली आहे. चशोती हे त्या ठिकाणांपैकी एक आहे, जिथे तीर्थयात्री आपली वाहने पार्क करतात आणि 2,800 मीटर उंचीवर असलेल्या मचैल माता मंदिराकडे पायी यात्रा सुरू करतात. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, पूरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला जात आहे. त्यांनी किश्तवाडचे जिल्हाधिकारी पंकज कुमार शर्मा आणि जम्मू-काश्मीर विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुनील कुमार शर्मा यांच्याशी चर्चा केली आहे. जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले की, परिसरात मोठ्या प्रमाणात बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे.
#WATCH | J&K | A flash flood has occurred at the Chashoti area in Kishtwar following a cloud burst. Rescue Operations have been initiated.
Latest visuals from the area, showing the extent of damage. pic.twitter.com/pCsgP0GZq2
— ANI (@ANI) August 14, 2025
विरोधी पक्षनेत्यांची प्रतिक्रिया –
जम्मू-काश्मीरमधील विरोधी पक्षनेते आणि पद्दर-नागसेनीचे आमदार सुनील कुमार शर्मा म्हणाले, “आमच्याकडे अद्याप मृत्यू किंवा नुकसानीचा नेमका आकडा उपलब्ध नाही, परंतु मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता आहे. मी उपराज्यपालांशी संपर्क साधून बचाव कार्यासाठी एनडीआरएफ पथकाची मागणी करणार आहे.”
#WATCH | J&K | A flash flood has occurred at the Chashoti area in Kishtwar following a cloud burst. Rescue Operations have been started. pic.twitter.com/MKj5DQwrKK
— ANI (@ANI) August 14, 2025
उपराज्यपालांनी व्यक्त केले दुखः
जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या घटनेबद्दल दुखः व्यक्त केले आहे. त्यांनी जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली असून, नागरी प्रशासन, पोलिस, लष्कर, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ अधिकाऱ्यांना बचाव आणि मदत कार्याला गती देण्याचे आणि प्रभावितांना सर्वतोपरी सहाय्य प्रदान करण्याचे निर्देश दिले आहेत.
या घटनेमुळे किश्तवाड परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे, आणि प्रशासन पूर्ण ताकदीने बचाव कार्यात गुंतले आहे. हवामानातील अडचणी लक्षात घेता, मदत कार्यात आणखी विलंब होण्याची शक्यता आहे.

