नैसर्गिक अधिवास अडचणीत; सर्प पुजनाबरोबरच संवर्धनाची गरज

सातारा : अन्न साखळीतील महत्वाचा घटक असणाऱ्या सापांच्या अस्तित्वाला वाढत्या शहरीकरणाने मोठा धोका निर्माण झाला आहे. सिमेंटच्या जंगलांमुळे सापांच्या नैसर्गिक अधिवासाचा ऱ्हास होत आहे. शहरीकरण, रस्ते बांधणी, शेतीत रासायनिक खतांचा वापर आणि अतिक्रमण यामुळे जंगलं, कुरणं, ओढ्यांचे काठ आणि झाडाझुडपांचा नाश होत आहे.
यामुळे कित्तेक सर्पाच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्या अधिवासात अन्न, पाणी किंवा निवारा उपलब्ध नसल्याने निसर्गातील साप मानवी वस्तीकडे येऊ लागल्याने मानव साप संघर्षही टोकावर आहे. नागपंचमी सणाच्या निमित्ताने सर्प पुजनाबरोबरच संवर्धनाची गरज पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत.
श्रावण महिन्यात येणारा नागपंचमी सण महिला अत्यंत श्रद्धेने साजरा करतात. नागदेवतांची पूजा करताना आपण निसर्गातील एका अद्भुत आणि पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाच्या प्रजातीला वंदन करत असतो. परंतु सण साजरा करताना जर त्याला वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड दिली, तर हा दिवस सर्पसंवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. सापांविषयी भीती आणि गैरसमज बाळगण्यापेक्षा सर्प हे परिसंस्थेतील एक महत्त्वाचे घटक म्हणून त्यांच्याकडे पाहणे गरजेचे आहे.
अन्न साखळीतील महत्वाचा घटकपर्यावरणातील अन्नसाखळीत उंदरांसारख्या शेतीला उपद्रवी ठरणाऱ्या प्राण्यांवर साप नियंत्रण ठेवतात. गरूडासारख्या पक्ष्यांचे भक्ष्य म्हणूनही पर्यावरणातील अन्नसाखळीत सापांना महत्व आहे. भारतामध्ये सुमारे ३०० हुन अधिक सर्पप्रजाती आढळतात, यातील केवळ काहीच विषारी असून, उर्वरित साप मानवाला कोणतीही हानी करत नाहीत. ते माणसांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. पर्यावरण टिकवण्यासाठी सापांचे अस्तित्व अत्यंत महत्त्वाचे आहे.
सापांविषयी प्रबोधन होणे आवश्यक
भारत हा जगातील सर्वाधिक सर्पदंश असलेला देश आहे. दरवर्षी सुमारे ५० हजार लोकांचा मृत्यू सर्पदंशामुळे होतो. सर्प दंशानंतर कोणी वाचले तरी सापाच्या विषाने अवयवाला झालेल्या गंभीर दुखापतीने ग्रस्त होतात. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा कमी असल्यामुळे सर्पदंशाने मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.
नागपंचमीच्या निमित्ताने या प्राण्याविषयी वैज्ञानिक माहिती आणि संवर्धनाच्या दृष्टीकोनातून पावले उचलली जाणे महत्वाचे आहे. यासाठी सर्पांच्या अधिवासाचा शास्त्रीय अभ्यास होणे गरजेचे आहे. लोकांमधील या संबंधातील असणारे गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. सर्पदंशाविषयी गांभीर्याने पाहून त्यासंदर्भात जनजागृती आणि उपाय योजना करणे हि आवश्यक आहे.
भारतामध्ये १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार सर्व साप संरक्षित प्रजातींमध्ये मोडतात. सापांना मारणे, पकडणे, त्रास देणे, जवळ बाळगणे त्याच प्रमाणे त्यांचे अधिवास नष्ट करणे कायद्याने गुन्हा आहे. नागपंचमीसारख्या सणाच्या निमित्ताने सापांच्या आणि त्यांच्या अधिवासाच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. विकासाच्या नावाखाली सापांची वस्तीस्थाने नष्ट केली जातात. यामुळे सर्पांच्या नैसर्गिक अधिवासावर आणि त्यांच्या अस्तित्वावर धोका निर्माण झाला आहे. यातूनही मानवासोबतचा सापांचा संघर्ष सुरू झाला.
– अमित सय्यद, वन्यजीव अभ्यासक





