मतदार याद्यांची देशव्यापी पडताळणी ऑक्टोबरपासून? निवडणूक आयोगाने दिल्या सज्ज राहण्याच्या सूचना

नवी दिल्ली – केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांना मतदार याद्यांच्या पडताळणीसाठी (एसआयआर) सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सज्जतेसाठी ३० सप्टेंबरची डेडलाईन देण्यात आली आहे. त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून मतदार याद्यांमध्ये सुधारणा करण्याची देशव्यापी प्रक्रिया सुरू होण्याची चिन्हे आहेत.
लवकरच विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या बिहारमध्ये काही दिवसांपूर्वी मतदार याद्या पडताळणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला. त्या प्रक्रियेला जोरदार विरोध दर्शवत विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे मोठे राजकीय वादळ उठले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत निवडणूक आयोगाने बिहारनंतर संपूर्ण देशभरात पडताळणी प्रक्रिया राबवण्याचा मानस व्यक्त केला. आता देशव्यापी प्रक्रियेसाठी आयोगाने हालचाली सुरू केल्याचे सूचित होत आहे.
दिल्लीत नुकतीच आयोगाने राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची परिषद आयोजित केली. त्यावेळी देशव्यापी पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यासाठी पुढील १० ते १५ दिवसांत तयार राहण्याच्या सूचना आयोगाने दिल्या. प्रक्रियेबाबत अधिक स्पष्टता येण्यासाठी चालू महिना अखेरची मुदत निश्चित करण्यात आली.
याआधीची पडताळणी झाल्या नंतरच्या याद्या तयार ठेवाव्यात असेही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. त्यानंतर अनेक राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी तत्कालीन याद्या वेबसाईटस्वर प्रसिद्धही केल्या. देशाची राजधानी दिल्लीत याआधी वर्ष २००८ मध्ये पडताळणी प्रक्रिया झाली. त्यानंतरच्या याद्या दिल्ली मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या वेबसाईटवर सध्या उपलब्ध आहेत.
उत्तराखंडच्या वर्ष २००६ पासूनच्या याद्या वेबसाईटवर आहेत. मागील पडताळणी ताज्या प्रक्रियेसाठी कट-ऑफ तारीख ठरेल. बहुतांश राज्यांत वर्ष २००२ ते २००४ या कालावधीत पडताळणी झाली. त्यामुळे बहुतांश राज्यांतील निम्म्याहून अधिक मतदारांना कुठली कागदपत्रे सादर करावी लागणार नाहीत, असे मानले जात आहे.
पुढील वर्षी पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळेही मतदार याद्यांच्या पडताळणीला मोठे महत्व प्राप्त होणार आहे. परदेशांतून भारतात अवैध शिरकाव केलेल्या घुसखोरांचा मतदार म्हणून याद्यांमध्ये समावेश होऊ नये हा पडताळणीचा प्रमुख उद्देश आहे.
बांगलादेश, म्यानमारसह इतर देशांतून आलेले अवैध स्थलांतरित सध्या विविध राज्यांत सरकारी यंत्रणांच्या रडारवर आहेत. त्यामुळेही देशव्यापी मतदार याद्या पडताळणीला आणखी महत्व प्राप्त होणार आहे. बिहारमधील प्रक्रियेवर तीव्र आक्षेप घेत विरोधक रस्त्यांवर उतरले. आता प्रस्तावित देशव्यापी प्रक्रियेवरून संपूर्ण देशातील राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे.





