राज्य सरकार विरोधात राष्ट्रवादी युवकचे पिंपरी चिंचवडमध्ये आंदोलन

पिंपरी, दि. 16, (प्रतिनिधी) -वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याच्या निषेधार्थ शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. भोसरी येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष अजित गव्हाणे, युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वाखाली शिंदे-फडणवीस सरकारच्या निषेधार्थ हे आंदोलन केले. या आंदोलनात महिला अध्यक्ष कविता आल्हाट, माजी नगरसेवक पंकज भालेकर, संजय वाबळे, प्रसाद शेट्टी, माया बारणे, माजी नगरसेविका संगीता ताम्हणे, ओबीसी सेलचे अध्यक्ष विजय लोखंडे, काशीनाथ नखाते, वाहतूक सेल अध्यक्ष काशिनाथ जगताप, ज्योती गोफणे, व्यवस्थापन सेल अध्यक्ष अकबर मुल्ला, सचिन औटे, सुदाम शिंदे, कविता खराडे, उज्वला ढोरे, संगीता कोकणे, उत्तर भारतीय सेल अध्यक्ष लाल मोहम्मद चौधरी, युवक कार्याध्यक्ष निलेश निकाळजे, युवराज पवार, प्रवीण खरात, आयुष निंबारकर, रोहित वाबळे, अमोल रावळकर, तुषार ताम्हणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, शिंदे फडणवीस सरकार महाराष्ट्राच्या दीड लाख युवकाचा रोजगाराच्या संधी गुजरातच्या घशात घालण्याचे जे काम करत आहे यावरून स्पष्ट होत आहे की हे गुजरात धार्जिणा असून महाराष्ट्राच्या युवकांशी यांचं काहीही घेणे देणे नाही. म्हणून वेदांत सारखा प्रकल्प व्यवसायासाठी पूरक असा वातावरण गुजरातपेक्षा महाराष्ट्रात चांगले असून देखील गुजरातला पळवण्याचा पाप या शिंदे फडणवीस सरकारने केल्याचा आरोप गव्हाणे यांनी केला.
युवक अध्यक्ष इम्रान शेख म्हणाले, प्रत्येक वर्षी दोन कोटी नोकऱ्या युवकांना देऊ असं म्हणून भाजपने तरूणांना नोकऱ्या तर दिल्या नाहीत परंतु आहेत त्या नोकऱ्या सुद्धा हिरावून घेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचं भाकरी खातात परंतु गुजरातची चाकरी करतात असा आरोप त्यांनी या वेळेस केला.





