Budget 2025 : “सरकारचा मंत्र सबका साथ, सबका विकास..”; नेमकं काय म्हणाल्या राष्ट्रपती? पाहा Video

Druapadi Murmu । Budget 2025 । संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. तर 1 फेब्रुवारीला म्हणजेच उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेमध्ये अर्थसंकल्प मांडतील. त्यापूर्वी म्हणजेच आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.
देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करत आहेत. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सरकारच्या कामगिरी बद्दल सांगितलं तसेच, अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर देखील भाष्य केल्याचं दिसून आलं. राष्ट्रपती आपल्या भाषणात नेमक्या काय म्हणाल्या यावर एक नजर टाकुयात….
सर्वात आधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संविधान निर्मात्यांन नमन केले. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभदरम्यान झालेल्या दुर्घटनेबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही राष्ट्रपतींनी श्रद्धांजली वाहिली. आणि नंतर आपल्या भाषणाला सुरुवात केली.
त्या म्हणाल्या की, “आज भारत डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक प्रमुख जागतिक खेळाडू म्हणून आपले अस्तित्व निर्माण करत आहे. जगातील विकसित राष्ट्रे देखील भारताच्या UPI व्यवहार प्रणालीच्या यशाने आश्चर्यचकित झाले आहेत. सामाजिक न्याय आणि समानतेसाठी भारत सरकारने डिजिटल तंत्रज्ञानाचा एक साधन म्हणून वापर केला आहे.
भारत सरकार सायबर सुरक्षेमध्ये कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी सतत काम करत आहे. डिजिटल फसवणूक, सायबर गुन्हे आणि डीपफेक ही सामाजिक, आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर आव्हाने आहेत, असं द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संसदेत म्हणाल्या, ‘महिला शक्ती बळकट करण्यासाठी सरकारही काम करत आहे. सरकारी योजनांमधून गरिबांना सन्मान मिळाला आहे. सरकारचा मंत्र सबका साथ, सबका विकास आहे. या सरकारमध्ये आयुष्मान भारत योजनेअंतर्गत सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विमा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारने नुकताच आठवा वेतन आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. युनिफाइड पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना 50 टक्के पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्यमवर्गीयांचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीही सरकार कटिबद्ध आहे. रेरा कायदा झाला आणि लोकांना घरांसाठी अनुदान दिले जात आहे. असं देखील ते यावेळी म्हणाले.
राष्ट्रपती मुर्मू पुढे म्हणाल्या की, ‘आज आपले तरुण स्टार्टअपपासून अंतराळापर्यंत देशाला गौरव मिळवून देत आहेत. गेल्या दशकात मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि स्टँड अप इंडिया योजनांच्या माध्यमातून तरुणांना अनेक संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आज देशात लाखो स्टार्टअप्स आहेत’. यावेळी त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांना अधोरेखित केलं आहे.





