Nashik News : “नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटीचा इशारा..”; CM फडणवीस नेमकं काय म्हणाले? पाहा….
नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसह घाट परिसरात प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

Nashik News – अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा रौद्र रूप धारण केले आहे. हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी उद्या (7 जुलै) रेड अलर्ट जारी करत अतिमुसळधार ते ढगफुटीसदृश पावसाची गंभीर शक्यता वर्तवली आहे.
या पार्श्वभूमीवर नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसह घाट परिसरात प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. नाशिक महानगरपालिका हद्दीसह जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये मंगळवारी बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने जारी केले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत घेतलेल्या आपत्कालीन आढावा बैठकीत नाशिकच्या परिस्थितीबाबत मोठी चिंता व्यक्त केली होती. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे नाशिक जिल्ह्यात मंगळवारी तब्बल 300 मिलिमीटरहून अधिक म्हणजे ढगफुटीसदृश पाऊस होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा पाऊस प्रामुख्याने त्र्यंबकेश्वर आणि आजूबाजूच्या डोंगराळ परिसरात कोसळू शकतो.
या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरडी कोसळण्याची ठिकाणे आणि बंद होऊ शकणारे रस्ते ओळखून पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
तसेच पुढील काही दिवस पर्यटकांनी त्र्यंबकेश्वर आणि नाशिक परिसरातील पर्यटन स्थळांवर जाणे पूर्णपणे टाळावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे. पावसाची भीषणता लक्षात घेता केवळ शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलेली नाही, तर जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळे देखील सुरक्षेचा उपाय म्हणून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध अकरावे ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिरआणि साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेले सप्तश्रृंगी निवासिनी देवी देवस्थान सोमवारी सायंकाळपासून बुधवारी सकाळी 9 वाजेपर्यंत भाविकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील हवामान स्थिती अत्यंत गंभीर असून पुढील काही तास निर्णायक ठरू शकतात. प्रशासनाने घेतलेले प्रतिबंधात्मक निर्णय हे जीवितहानी टाळण्यासाठी महत्त्वाचे मानले जात आहेत. नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.






