नाशिक : महानगरपालिका निवडणुकीच्या (१५ जानेवारी) पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राजकीय भूकंप घडला आहे. मंत्री छगन भुजबळ यांचे कट्टर आणि विश्वासू समर्थक कैलास मुदलियार यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनामध्ये प्रवेश केला आहे. हा प्रवेश अजित पवार गटाला सर्वात मोठा धक्का मानला जात असून, भुजबळ यांच्या प्रभावक्षेत्रातही मोठी खळबळ उडाली आहे. मुदलियार हे नाशिकमध्ये भुजबळ यांचे जवळचे नेते म्हणून ओळखले जातात. गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाशी चर्चा सुरू होती. आता या प्रवेशामुळे शिंदे शिवसेनेने भुजबळ यांना कोंडीत पकडण्याची मोठी खेळी केली आहे असे बोलले जात आहे. पक्षप्रवेश सोहळा शिवसेनेच्या कार्यालयात पार पडला असून, यावेळी मंत्री दादा भुसे उपस्थित होते. नाशिक महापालिकेत सुहास कांदे (शिंदे गट) आणि छगन भुजबळ (अजित पवार गट) यांच्यातील प्रतिष्ठेची लढत असतानाच या घडामोडींना वेग आला आहे. मुदलियार हे प्रभाग क्रमांक २० मधून निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. महायुतीत असूनही, या प्रवेशामुळे भाजप नाशिकमध्ये स्वबळावर लढण्याच्या हालचालींना वेग आल्याचे सांगितले जात आहे. हा प्रवेश भुजबळ यांच्या स्थानिक प्रभावावर मोठा फटका ठरू शकतो. नाशिक महापालिकेत चुरस रंगली असून, महायुतीतील अंतर्गत स्पर्धा आणि विरोधकांची रणनीती यामुळे चित्र अधिक गुंतागुंतीचे झाले आहे.