Nashik MLC Election : नाशिक पदवीधरमध्ये सत्यजित तांबेंची विजयाच्या दिशेने आगेकूच

नगर (प्रतिनिधी) – मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत सुरुवातीला विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. मात्र, पहिल्या फेरीसह दुसरी फेरी पूर्ण झाल्यानंतर ही निवडणूक आता एकतर्फी होत असल्याचे लक्षात आले. पहिल्या फेरीपासून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी आघाडी घेतली. रात्री उशिरा तिसऱ्या फेरीतही ते आघाडीवर राहिले असून, विजयाच्या दिशेने तांबे यांनी आगेकूच सुरू ठेवली आहे. तांबे यांना 45 हजार 660, तर महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी 24 हजार 927 मते मिळाली आहेत.
दरम्यान, सायंकाळी पाचच्या सुमारास अवैध-वैध मतपत्रिकांवरून उमेदवारांच्या समर्थकांनी आक्षेप घेतल्याने मतमोजणी केंद्रावर काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी राज्य राखीव दलाच्या तुकड्या तातडीने पाचारण केल्या होत्या.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सकाळी 8 वाजल्यापासून नाशिक येथील सय्यद पिंप्री येथील गोदामात मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीसाठी 28 टेबलची व्यवस्था करण्यात आली होती. एक टेबलवर एक तहसीलदार व दोन नायब तहसीलदार यांची नेमणूक करण्यात आली होती. प्रथम मतपेट्या उघडून बाद मते बाहेर काढण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झाली. पहिल्या पसंतीच्या मतावर उमेदवार विजयी झाल्यास सायंकाळी 6 पर्यंत निकाल लागू शकतो, असे सांगण्यात आले होते. मात्र, दुसऱ्या पसंतीवर निकाल लागल्यास रात्री निकालासाठी उशीर लागण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे.
पहिली फेरी सायंकाळी सहा वाजता जाहीर केली. या फेरीमध्ये सुरवातीला तांबे व पाटील यांच्यात चांगली चुरस पाहायला मिळाली. जळगाव जिल्ह्यातील मतपत्रिकांची मोजणी पहिल्या फेरीत झाली. मात्र, त्यानंतर तांबे यांनी आघाडी घेतली. पहिल्या फेरीत तांबे यांनी 7 हजार 922 मतांची आघाडी घेतली. तांबे यांना 15 हजार 784, तर शुभांगी पाटील यांना 7 हजार 862 मते मिळाली. या फेरीत मतदान झालेल्या 1 लाख 29 हजार 456 मतदानापैकी 25 हजार 259 मते वैध होती, तर 2 हजार 741 मते बाद झाली.
त्यानंतर दुसरी फेरी रात्री 7.45 ला जाहीर करण्यात आली. दुसऱ्या फेरीत तांबे यांनी 14 हजार 693 मतांची आघाडी घेतली. तांबे यांना 31 हजार 9, तर पाटील यांना 16 हजार 316 मते मिळाली. या फेरीत 50 हजार 555 मते वैध ठरली, तर 5 हजार 445 मते बाद झाली. तिसऱ्या फेरीत तांबे 20 हजार 733 मतांनी आघाडीवर होते. 48 पोस्टल मते वैध, तर 12 मते अवैध ठरली आहेत.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/nagpur-mlc-election-sudhakar-adbale-won-from-nagpur/
सायंकाळी पाचच्या सुमारास गोंधळ निर्माण झाला. टेबल 13वर अवैध-वैध मतपत्रिकांवरून तांबे आणि पाटील यांच्या समर्थकांनी आक्षेप घेतल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. या प्रकाराने मतमोजणी केंद्राच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे तातडीने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या पाचारण केल्या होत्या.
ग्रॅज्युएट तरी मोठ्या संख्येने मतपत्रिका बाद
शिक्षित लोकांच्या पदवीधर मतदारसंघाची ही निवडणूक असताना त्यांना मतदान कसे करावे, यासंबंधी माहिती नसल्याचे दिसून आले. तिसऱ्या फेरीपर्यंत तब्बल 8 हजार 378 मते बाद झाली. पहिल्या फेरीत 2 हजार 741, तर दुसऱ्या फेरीत बाद मतांचा आकडा हा 5 हजार 445 मतांवर गेला होता.





