भाजप-शिंदेसेनेला धक्का देणारा निकाल! ‘या’ पक्षाला घवघवीत यश; आतापर्यंत १४ जागा जिंकल्या, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची…

संगमनेर : राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीचे कल हाती आले असून, अनेक ठिकाणी भाजप-शिवसेना ((शिंदे) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व दिसत आहे. या निवडणुकीकडे राज्यातील मिनी विधानसभेची निवडणूक म्हणून पाहिली जात आहे. दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का देणारे निकाल लागले आहेत.
त्यामुळे या निवडणुकीत आघाडी पूर्णपणे बॅकफूटवर गेली आहे. मात्र, राज्यातील अशी एक नगरपालिका आहे जिथे भाजप शिवसेनेला धक्का देणारा निकाल लागणार आहे. संगमनेर नगरपालिका निवडणुकीत संगमनेर सेवा समितीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मैथीली तांबे विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्या संगमनेर सेवा समिती पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या.
आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार संगमनेर सेवा समितीचे 14 नगरसेवक विजयी झाले आहेत. अद्यापर्यंत तरी महायुतीला येथे खातंही उघडता आलेले नाही. खरंतर संगमनेरची निवडणूक विविध कारणांमुळे गाजली. या निवडणुकीत सत्यजीत तांबे आणि बाळासाहेब थोरात स्वतः मैदानात उतरले होते. नगराध्यक्षपदासाठी मोठी चुरस निर्माण झाली होती. आमदार पत्नी विरुद्ध आमदार भावजय अशी लढत रंगली. अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे आणि महायुतीचे आमदार अमोल खताळ यांची भावजय सुवर्णा खताळ यांच्यात थेट सामना होत आहे.





