Balasaheb Thorat – विधानपरिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत बोलताना प्रदेशाध्यक्षांसह काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने मला राहुल गांधींची अपाँइटमेंट घेऊन एक तासात त्यांना भेटून दाखवावे, असे एकप्रकारे आव्हानच त्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना केले होते. आता यावर प्रतिक्रिया देताना सत्यजित तांबे यांचे मामा आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांना बालिश म्हटले आहे. तसेच त्यांनी विचार करून बोलावे, असा सल्लाही थोरात यांनी दिला आहे. थोरात यांनी आज मुंबई पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात तसेच विविध विषयांवर भाष्य केले. थोरात म्हणाले, सत्यजित तांबे बोलले हे खरे आहे. एकतर आपल्या जीवनात ज्यांनी आपल्यासाठी काही केले आहे ते ऋण कायम लक्षात ठेवले पाहिजेत. काँग्रेसने सत्यजितसाठी खूप काही केले आहे. पण त्यांचे बोलणे अजूनही बालिशपणाचे आहे. त्यांनी जरा विचार करून बोलावं. ते आता स्वतंत्र आहेत, पण काय बोलावे आणि काय नाही हे शिकले पाहिजे, असा घणाघात थोरात यांनी सत्यजित तांबे यांच्यावर केला. सरसकट हेक्टरी 50 हजारांची मदत द्यावी शेतकऱ्यांचे मान्सूनपूर्वीच कंबरडे मोडले आहे. त्यामुळे खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना काही मदत द्यावी लागणार आहे. त्यांना तुटपुंजी मदत देऊन काही होणार नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत सरकारने द्यावी, असा आग्रह प्रदेश काँग्रेसने धरला असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले. नेमके नुकसान काय झाले? हे पाहून त्या पद्धतीने नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही केली पाहिजे, अशी मागणीही बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने केली आहे.