Satyajit Tambe : पुणे-नाशिक नव्या रेल्वे मार्गाला विरोध कायम; लढा तीव्र होणार, समिती गठित करणारः सत्यजीत ताबे यांची माहिती

पुणे: पुणे- नाशिक सेमीहाय स्पीड रेल्वेच्या जुन्या मार्गात जीएमआरटीचा महाकाय दुर्बिणीचा प्रकल्प अडथळा ठरत होता. यामुळे प्रकल्पाला कोणताही धक्का न लावता हा प्रकल्प वगळून नवीन मार्ग करण्याचा निर्णय केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्यात भेट देत घेतला. त्यामुळे पुणे-नाशिक रेल्वे मार्गात संगमनेर येणार नाही.
तर पुण्यावरुन अहिल्यानगर, शिर्डीमार्गे नाशिककडे असा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. मात्र, या निर्णयाला विधान परिषदेचे आमदार सत्यजीत तांबे यांनी आक्षेप घेतला असून जुन्याच मार्गानुसारच हा प्रकल्प पूर्ण करण्याची मागणी केली होती. तसे न झाल्यास आगामी काळात सर्वपक्षीय नेत्यांचा लढा उभारणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.
त्यानुसार आता ३ मार्चपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेणार असल्याचे तांबे यांनी सांगितले आहे. याविषयीची पोस्ट त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून शेअर केली आहे. पुणे-नाशिक रेल्वेसाठी सर्वपक्षीय लढ्यासाठी 3 मार्चपासून सुरुवात होणार. मुंबईत होणार सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची पहिली बैठक ! यापूर्वी मी 1 मार्च 2024 रोजी पुणे-नाशिक सेमी हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पासंदर्भात या मार्गावर येणाऱ्या सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण आणि पुणे या भागांतील लोकप्रतिनिधींना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले होते, असे त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
यासंदर्भात आज पुन्हा मी सर्व मा. आमदार आणि मा. खासदारांना स्वतः फोन करून आणि पत्र पाठवून मुंबईत ३ मार्चपासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बैठकीस येण्याचे आमंत्रण दिले आहे, असे त्यांनी पोस्ट केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. आम्ही सर्वजण आंतरिक राजकीय मतभेद विसरून विकासाच्या दृष्टीने सकारात्मकपणे एकत्र येणार असून कृती समिती स्थापन करण्याच्या दृष्टीने आम्ही सविस्तर चर्चा करणार आहोत, असे देखील त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आ. दिलीप वळसे पाटील (आंबेगाव-शिरूर विधानसभा), आ. माणिकराव कोकाटे (सिन्नर विधानसभा), आ. शरद सोनवणे (जुन्नर विधानसभा), आ. अमोल खताळ (संगमनेर विधानसभा), आ. बाबाजी काळे (खेड-आळंदी विधानसभा), खासदार राजाभाऊ वाजे (नाशिक लोकसभा), खासदार भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी लोकसभा), खासदार डॉ. अमोल कोल्हे (शिरूर लोकसभा) यांची नाव देखील लिहिली आहेत.
पुणे-नाशिक रेल्वे सरळ मार्गेच (सिन्नर-संगमनेर-नारायणगाव-मंचर-राजगुरुनगर-चाकण) व्हावी, यासाठी कृती समितीच्या माध्यमातून आपण हा लढा तीव्र करणार आहोत. या बैठकीत नक्कीच ठोस निर्णय घेतले जातील, असा विश्वास वाटत असल्याचे सत्यजीत तांबे म्हणाले आहेत.





