Nashik News : नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये ७९.०६ टक्के पाणीसाठा; गंगापूर धरण ८४ टक्क्यांवर
Nashik News : नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील एकूण पाणीसाठा ७९.०६ टक्क्यांवर पोहोचला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा ८४.५१ टक्के इतका आहे.

Nashik News : नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील एकूण पाणीसाठा ७९.०६ टक्क्यांवर पोहोचला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा ८४.५१ टक्के इतका आहे. रविवारी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत शहरात ३७.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. (Nashik News)
बागलाण तालुक्यातील अजमेर सौंदणे येथे पावसादरम्यान शेतातील पाण्याचा पंप सुरू करताना एका शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. एकूण ३२ घरांचे नुकसान झाले असून सुमारे ८० हेक्टर शेतजमीन बाधित झाली आहे. नुकसानीच्या पाहणीचे काम सुरू आहे. (Nashik News)
पूरस्थितीमुळे ४२९ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने निफाड तालुक्यातील नागरिकांचा समावेश आहे. ओझर येथील बाणगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून, नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Nashik News)
अधिकृत आकडेवारीनुसार, गंगापूर धरणातून एकूण ४९४७ क्युसेक पाणी सोडण्यात आले. तसेच दारणा धरणातून १३२५० क्युसेक, नांदूर-मध्यमेश्वर बंधाऱ्यातून ४९०६६ क्युसेक आणि चणकापूर धरणातून ७५९१ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. (Nashik News)





