Narendra Modi : आमचे सरकार पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर ऑपरेशन सिंदूरसारखी धाडसी कारवाई करत असताना, काँग्रेस मात्र शेजारील देशाच्या सुरात सूर मिसळून त्यांच्या तालावर नाचत आहे, अशा तीव्र शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सोमवारी आसाममधील निवडणूक सभेत काँग्रेसवर हल्लाबोल केला. आसामच्या बारपेटा जिल्ह्यातील सभेत बोलताना मोदी म्हणाले की, काँग्रेसचा पाकिस्तानशी असलेला हा संबंध देशाच्या सुरक्षेशी तडजोड करणारा आहे. भाजप राष्ट्रहितासाठी कटिबद्ध असून आम्ही देशाच्या सुरक्षिततेशी कधीही तडजोड होऊ देणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच, काँग्रेसने वन रँक, वन पेन्शन सारख्या योजना प्रलंबित ठेवून लष्कराची वर्षानुवर्षे उपेक्षा केली, मात्र भाजपने सैनिकांना न्याय मिळवून दिला, असेही त्यांनी नमूद केले. Narendra Modi पंतप्रधानांनी काँग्रेसच्या विकासाच्या दृष्टीकोनावरही टीका केली. काँग्रेसने भ्रष्टाचारासाठी नेहमीच तात्पुरत्या उपाययोजना केल्या, तर भाजप समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण आणि दीर्घकालीन विकासासाठी कार्यरत आहे. आसाममध्ये गेल्या १० वर्षांत शांतता करारांच्या प्रामाणिक अंमलबजावणीमुळेच आज विकासाची प्रक्रिया सुरू झाली आहे.हे स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. महिला मतदारांना संबोधित करताना मोदींनी सांगितले की, संसदेतील ३३ टक्के महिला आरक्षण २०२९ च्या निवडणुकीपासून लागू होईल. आसाममधील महिलांनी या ऐतिहासिक बदलासाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सुचवले. आसाम विधानसभेच्या १२६ जागांसाठी ९ एप्रिल रोजी मतदान होणार असून, त्याचा निकाल ४ मे रोजी जाहीर होईल.