Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जेवर विमानतळाचे उद्घाटन
भारतातील सर्वात मोठे राज्य आता, सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या राज्यांपैकी एक ठरले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केले.

Narendra Modi : पूर्वीच्या काळात नोएडाला भ्रष्टाचाराचे केंद्र बनवण्यात आले होते. परंतु आज भाजप सरकारच्या काळात तेच नोएडा उत्तर प्रदेशच्या विकासाचे मुख्य शक्तिस्थान बनले आहे. भारतातील सर्वात मोठे राज्य आता, सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या राज्यांपैकी एक ठरले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केले.
उत्तर प्रदेशातील जेवर विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सपावर जोरदार टीका केली. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.
नरेंद्र मोदी म्हणाले, जेवर विमानतळावरून दर दोन मिनिटांनी विमानाचे उड्डाण होईल. हा प्रकल्प केवळ एक इमारत नसून तो तरुणांच्या स्वप्नांना आणि भविष्याला नवी झेप देणारा मार्ग आहे. २०१४ पूर्वी देशात केवळ ७४ विमानतळ होते. परंतु आज ही संख्या १६० हून अधिक झाली आहे. आता हवाई सेवा केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित न राहता देशातील छोट्या गावांपर्यंत पोहोचत आहे. ज्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत.
उत्तर प्रदेशाच्या पश्चिम भागातच गेल्या काही आठवड्यांत उद्घाटन वा पायाभरणी झालेला हा चौथा मोठा प्रकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. या काळात नोएडामध्ये एका मोठ्या सेमीकंडक्टर कारखान्याची पायाभरणी झाली, देशातील पहिल्या दिल्ली मेरठ नमो भारत ट्रेनला गती मिळाली, मेरठ मेट्रो रेल्वेचा विस्तार केला गेला आणि आज नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होत आहे असे पंतप्रधानांनी सांगितले.
दरम्यान, आपल्या भाषणात पश्चिम आशियातील सुरू असलेल्या युद्धाचाही त्यांनी उल्लेख केला. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या या युद्धामुळे जगात अन्नधान्य, इंधन आणि खतांचे संकट उभे ठाकले आहे. अनेक देश या आव्हानांचा सामना करण्यास असमर्थ ठरत असताना, भारत आपल्या नागरिकांच्या शक्तीच्या जोरावर या संकटाचा कणखरपणे मुकाबला करत आहे. विकसित उत्तर प्रदेश, विकसित भारत अभियानाचा हा एक नवा अध्याय असल्याचे सांगत त्यांनी आत्मनिर्भर भारताचा (Narendra Modi) संकल्प अधोरेखित केला.






