Narendra Modi : निवडणुकांतील सातत्यपूर्ण विजयामुळे एनडीएने आत्मसंतुष्ट होऊ नका; पंतप्रधान मोदींनी दिला सल्ला
विविध निवडणुकांतील सातत्यपूर्ण विजयामुळे एनडीएने आत्मसंतुष्ट होऊ नये, तर लोकहितासाठी जमिनीवर उतरून काम करत राहावे, असा स्पष्ट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मंगळवारी एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीत दिला.

Narendra Modi : विविध निवडणुकांतील सातत्यपूर्ण विजयामुळे एनडीएने आत्मसंतुष्ट होऊ नये, तर लोकहितासाठी जमिनीवर उतरून काम करत राहावे, असा स्पष्ट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मंगळवारी एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीत दिला.
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर सांगितले की, पंतप्रधानांनी (Narendra Modi)एनडीए खासदारांना बजावले की, युतीचा विजय हा लोकांच्या हिताची धोरणे आणि मेहनतीचे फलित आहे. जमिनीवर काम केल्याशिवाय निवडणुका जिंकता येत नाहीत.
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करत राहणे गरजेचे आहे, असे मोदींनी बोलताना स्पष्ट केल्याचे रिजिजू म्हणाले. या बैठकीत ३९ देशांशी यशस्वीपणे व्यापार करार पूर्ण केल्याबद्दल एनडीए नेत्यांनी पंतप्रधानांचा सत्कार केला. अमेरिका-भारत व्यापार कराराचा उल्लेख करत रिजिजू म्हणाले की, या करारामुळे भारतीय वस्तूंवरील शुल्क २५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी होणार असून, देशभर सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
शिंदेसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी सांगितले की, व्यापार करार असो वा अर्थसंकल्प, सरकार नेहमी भारताच्या हिताला प्राधान्य देते. भारत-अमेरिका आणि भारत-युरोप व्यापार करारांचे श्रेय पंतप्रधान मोदींच्या दृढ नेतृत्वाला जाते आणि याचा लाभ विशेषतः लहान व्यावसायिकांना होईल, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.
बैठकीत लोकसभा व राज्यसभा खासदारांसाठी संसदीय कामकाज आणि कल्याणकारी उपक्रमांबाबत मार्गदर्शन देण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. या बैठकीला भाजपसह टीडीपी, जेडी(यू), शिवसेना, जेडी(एस), एलजेपी (आर) आणि इतर एनडीए घटक पक्षांचे खासदार तसेच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शाह, जे.पी. नड्डा यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.
हे पण वाचा : Rohit Pawar : बेकायदा काम करण्याची हिंमत कशी झाली? सर्वोच्च न्यायालयाने रोहित पवारांना फटकारले






