Pune District : नारायणगाव उपबाजारचे शेड जमीनदोस्त
Pune District : घटनेनंतर बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनी नुकसानाबद्दल दुःख व्यक्त करताना सांगितले की, शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी तातडीने पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

नारायणगाव : मंगळवारी (दि.२) दुपारी नारायणगाव परिसरात गारा आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले. या वादळाच्या तडाख्यात जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार समितीने अवघ्या वर्षभरापूर्वी उभारलेले धना-मेथी मार्केटचे शेड पूर्णपणे जमीनदोस्त झाले. सुमारे ३८ लाख रुपये खर्चून उभारण्यातआलेल्या या शेडचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
पुणे-नाशिक महामार्गालगत १३ एकर जागेत धना-मेथी विक्रीसाठी हे शेड उभारण्यात आले होते. मंगळवारी (दि. २ जून) दुपारी वादळी वाऱ्यासह अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे संपूर्ण शेड कोसळले. घटनेची माहिती मिळताच बाजार समितीचे पदाधिकारी व संचालकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाजार समितीचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या धना-मेथी मार्केटच्या भवितव्याबाबत आता प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांची गैरसोय होऊ देणार नाही – संजय काळे
घटनेनंतर बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनी नुकसानाबद्दल दुःख व्यक्त करताना सांगितले की, शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी तातडीने पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. धना-मेथी विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनजवळील जुन्या बाजार समितीच्या आवारात आपला माल विक्रीसाठी आणावा, असे आवाहन त्यांनी केले. झालेल्या नुकसानीचा लवकरच पंचनामा करण्यात येणार आहे. तसेच तातडीने संचालक मंडळाची बैठक बोलावून पुढील कार्यवाही आणि नव्या नियोजनाबाबत निर्णय घेतला जाईल.
शेडच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह – माऊली खंडागळे
अवकाळी पावसात मार्केट शेड पडल्यानंतर सदर शेडच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. काही संचालकांनी या प्रकारच्या बांधकामाला सुरुवातीपासून विरोध दर्शविला होता. “वादळी वाऱ्यात शेड जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशातून उभारलेल्या ३८ लाख रुपयांच्या प्रकल्पाचे नुकसान झाले आहे. आम्ही विरोधक म्हणून नव्हे, तर शेतकऱ्यांच्या हितासाठी या कामावर आक्षेप घेतला होता,” असे माऊली खंडागळे यांनी सांगितले.
हेही वाचा : Pune District : देयकांसाठी ‘कर्मयोगी’वर वाहतूकदारांचा एल्गार





