Narayangaon News – तमाशा पंढरी म्हणून ओळख असलेल्या नारायणगाव येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रसिकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली. राष्ट्रपती पदक विजेत्या स्व. विठाबाई भाऊ मांग यांच्या स्मरणार्थ ओळखल्या जाणार्या या तमाशा पंढरीत एका दिवसात तब्बल 200 हून अधिक तमाशांचे करार झाले असून सुमारे 3 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तमाशा फड मालक अविष्कार मुळे व मोहित नारायणगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चालू वर्षात आतापर्यंत 8 ते 9 कोटींची उलाढाल झाली असून संपूर्ण हंगामात ती 10 ते 12 कोटींवर जाण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील यात्रा-जत्रांमध्ये तमाशाला मोठी मागणी असते. गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक तमाशा फडाचा करार सरासरी दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत झाल्याचे दिसून आले. वगनाट्य, पारंपरिक सादरीकरण तसेच मराठी-हिंदी गाण्यांच्या माध्यमातून तमाशा आजही ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग ठरत आहे. एप्रिल-मे महिन्यातील यात्रा-जत्रांच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडव्याच्या दिवशी ग्रामीण भागातील गाव पुढारी मोठ्या संख्येने तमाशा बुकिंगसाठी नारायणगाव येथे दाखल झाले होते. त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. तमाशा आजही ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग. दरम्यान, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या निधनामुळे काही भागात यात्रा-जत्रांचे स्वरूप साधे ठेवण्यात आले. परिणामी बारामती तालुक्यातील काही तमाशांच्या बुकिंग रद्द झाल्याने अनेक फडमालकांना आर्थिक फटका बसला आहे. आधी ठरलेल्या तारखा कमी दरात देण्याची वेळ आल्याचेही फडमालकांनी सांगितले. 30 फडांची उपस्थिती यंदा तमाशा पंढरीत एकूण 30 तमाशा फड मालकांच्या राहुट्या उभारण्यात आल्या आहेत. त्यापैकी सुमारे 10 फड सात महिन्यांसाठी, तर उर्वरित 20 फड दोन महिन्यांसाठी सादरीकरण करतात. तमाशाला ‘सुगी’चे दिवस यंदा प्रत्येक तमाशा फड मालकाचे गुढीपाडव्याच्या दिवशी पाच ते सात किंवा त्याहून अधिक तारखांचे बुकिंग झाले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा करारांचे प्रमाण वाढल्याने तमाशा व्यवसायाला चांगले दिवस आले असल्याचे चित्र दिसून येत आहे.