Mahabaleshwar Rain : महाबळेश्वर-पाचगणीला अवकाळीने झोडपले; ढीपाडव्यालाच पावसाची एन्ट्री; पाहा काय घडलं?
Mahabaleshwar Rain : रणरणत्या उन्हात महाबळेश्वर, पाचगणी आणि भिलार परिसराला पावसाने झोडपले; आठवडाभरापासून पेटलेले वनवे पूर्णपणे शमले.

Mahabaleshwar Rain – मार्च महिन्याच्या रणरणत्या उन्हात निसर्गाने आपली वेगळीच किमया दाखवली आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेने होरपळणाऱ्या भिलार, पाचगणी आणि महाबळेश्वर परिसराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर झालेल्या या पावसामुळे कुठे नागरिकांची धावपळ उडाली, तर कुठे निसर्गाच्या या ‘थंडाव्याने’ सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
गेल्या आठवडाभरापासून पाचगणी आणि महाबळेश्वरच्या डोंगरमाथ्यावर ठिकठिकाणी भीषण वनवे पेटले होते. या आगीत दुर्मिळ वनसंपदा, औषधी वनस्पती आणि असंख्य जीवजंतू होरपळून खाक झाले होते. हवेत सर्वत्र जळलेल्या गवताची राख उडत होती आणि निसर्गाचे मोठे नुकसान होत होते. मात्र, आज झालेल्या मुसळधार पावसामुळे हे वनवे पूर्णतः शमले आहेत.
“तप्त झालेली ही माती शांत करण्यासाठी निसर्गानेच हा पाऊस पाडला असावा,” अशी भावना स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे. पावसाने केवळ आग विझवली नाही, तर प्रदूषित झालेली हवाही स्वच्छ केली आहे. ऐन उन्हाळ्यात आलेल्या या पावसामुळे शेती क्षेत्रासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता कृषी तज्ञांनी वर्तवली आहे. मात्र, महाबळेश्वरचा मानबिंदू असलेल्या स्ट्रॉबेरी पिकासाठी हा पाऊस वरदान ठरू शकतो, असे बोलले जात आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे स्ट्रॉबेरीच्या झाडांना जो फटका बसत होता, तो या थंडाव्यामुळे काही प्रमाणात कमी होईल.
पर्यटकांची चंगळ; स्थानिकांची धावपळ
पावसाच्या रिमझिम सरी कोसळू लागताच पर्यटकांनी मात्र याचा मनसोक्त आनंद लुटला. पाचगणी-महाबळेश्वरच्या पॉईंट्सवर पावसात भिजण्याचा मोह पर्यटकांना आवरता आला नाही. दुसरीकडे, अचानक आलेल्या पावसामुळे आठवडे बाजार आणि कामानिमित्त बाहेर पडलेल्या स्थानिक नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.






