प्रभात वृत्तसेवा राजगुरूनगर – कनेरसर (ता. खेड) येथे शनिवारी (दि. ३ जानेवारी) पौष पौर्णिमेनिमित्त श्रीअंबिका माता यात्रोत्सवाचा प्रारंभ होत आहे. ५ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या तीन दिवसीय उत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष मोहनराव दौंडकर यांनी दिली आहे. यात्रोत्सवाच्या मुख्य आकर्षणांमध्ये भव्य बैलगाडा शर्यतींचा समावेश असून, रविवारी (दि. ४ जानेवारी) रात्री १० वाजता मंगला बनसोडे सह नितीनकुमार बनसोडे यांचा लोकनाट्य तमाशा आयोजित करण्यात आला आहे. सोमवारी (दि. ५ जानेवारी) सायंकाळी ४ वाजता कुस्त्यांचा भव्य आखाडा रंगणार असल्याचे सचिव प्रशांत म्हसुडगे यांनी सांगितले. उत्सवाची सुरुवात देवीला साडी-चोळी अर्पण करून आणि मांडव डहाळे कार्यक्रमाने होणार असल्याची माहिती खजिनदार जवाहर दौंडकर यांनी दिली.या सोहळ्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे, म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव, आमदार बाबाजीशेठ काळे, माजी आमदार दिलीपराव मोहिते, ॲड. विजयसिंह शिंदे, निर्मलाताई पानसरे, अतुलभाऊ देशमुख, नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ, सुखदेव सोनवणे, अशोकराव टाव्हरे, श्रीनाथ लांडे, सुधीर माशेरे, दिलीप माशेरे, सत्यवान दौंडकर, संतोष ताम्हाणे, पंकज दौंडकर, सचिन घाडगे, राजेश माशेरे, सयाजी मोहिते, धैर्यशील पानसरे यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे सरपंच सुनीता केदारी यांनी सांगितले.