Pune Rain Update : पुणेकरांची उडाली धांदल! वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; तापमानात मोठी घट
Pune Rain Update : पुणे वेधशाळेचा इशारा: पुढील २४ तास शहर आणि उपनगरात आकाश ढगाळ राहणार, दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता.

Pune Rain Update – शहरासह जिल्ह्यातील काही भागांत सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या, तर काही ठिकाणी मध्यम पाऊस झाला. मराठी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, पुढील २४ तासात शहर व उपनगरात दुपारनंतर आकाश ढगाळ राहील. काही भागांत मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
मागील दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात ऊन आणि ढगाळ वातावरणाचा लपंडाव सुरू आहे. बुधवारी (दि. १८) जिल्ह्यातील काही भागांत मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, तर तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस झाला. गुरुवारी (दि. १९) पहाटे हवेत गारवा होता. त्यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत आकाश निरभ्र होते.
मात्र, त्यानंतर आकाशात काळे ढग भरून आले आणि क्षणात कोथरूड, वारजे, सिंहगड रोड, कात्रज, पाषाण, धायरी या परिसरासह जिल्ह्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले. आज (गुरुवारी) गुढीपाडवा असल्याने सणासुदीची लगबग सुरू असताना अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली.
दरम्यान, अवकाळी पावसामुळे शहरातील कमाल तापमानात लक्षणीय घट झाली असून, पारा ३५ अंशांच्या खाली आला आहे. पुढील २४ तासांत शहर आणि जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविली असून, त्यानंतर पाऊस विश्रांती घेऊन कमाल तापमानात हळूहळू वाढ होण्यास सुरुवात होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.





