Narayan Rane : “विनोद तावडे यांच्याविषयी जे घडले ते योग्य नव्हते’; नारायण राणेंकडून संताप व्यक्त

Vinod Tawde । Narayan Rane : मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच मंगळवारी (ता. 19 नोव्हेंबर) विरारमध्ये मोठा राजकीय राडा पाहायला मिळाला. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना पैशांच्या बॅगेसह बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडले. यावेळी मोठा गोंधळ तर झालाच पण बविआच्या कार्यकर्त्यांनी भाजपा आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण देखील केली.
बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी तर भाजपाच्याच नेत्यांनी विनोद तावडे पाच कोटी रुपये वाटपासाठी येत असल्याचा गंभीर आरोप केला. त्यानंतर विनोद तावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहितेदरम्यान पत्रकार परिषद घेतल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणावर आता नारायण राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आज (बुधवार) दुपारी नारायण राणे यांनी पत्नी, दोन्ही मुले आणि सुनांसह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी विनोद तावडे यांच्यासोबत विरारमध्ये घडलेल्या घटनेवर भाष्य केले. आज मतदान केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना नारायण राणे यांना विनोद तावडे यांच्याबद्दल विचारण्यात आले.
यावेळी ते म्हणाले की, ‘विनोद तावडे यांच्याविषयी जे घडले ते योग्य नव्हते. ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यासारख्या एका पक्षाच्या नेत्याला अशाप्रकारे वागणूक देणे मला पसंत नाही. त्यामुळे विनोद तावडे यांना मिळालेली वागणूक आपल्याला आवडली नाही, अशा शब्दात नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला.
नारायण राणे पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरेंमुळे मी शिवसेना सोडली. त्यांचे विचार चांगले नाहीत. त्यांना 10 ते 12 पेक्षा जास्त जागा मिळणार नाही. पण महायुतीचे 161 आमदार निवडून येतील. भाजपा, राष्ट्रवादी काँगेस आणि शिवसेनेची सत्ता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.





