Devendra Fadnavis : “नारायण राणे म्हणजे मोजमाप न ठेवणारा दिलदार माणूस”; फडणवीसांचे कौतुकाचे उद्गार
Devendra Fadnavis : भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नाराणय राणे यांचा 74 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Devendra Fadnavis : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांचा 74 वा वाढदिवस सिंधुदुर्गात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंचे मनापासून कौतुक केले. “राणे हे मोजमाप न ठेवणारे दिलदार व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या कामामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग तयार झाला आहे,” असे कौतुकाचे उद्गार फडणीसांनी काढले. राणेंमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे विचार असल्यामुळे त्यांनी हिंदुत्व आणि मराठी माणसाचा मुद्दा कधीच सोडला नाही, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
प्रेरणा आणि मार्गदर्शनाची आठवण
फडणवीस यांनी राणेंसोबत काम करतानाचे अनुभव सांगताना एक खास प्रसंग सांगितला. “मी पहिल्यांदा सभागृहात भाषण केलं तेव्हा राणेंनी पाठवलेली ‘छान बोललास’ ही चिठ्ठी आजही आठवते,” असे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, गोपीनाथ मुंडे आणि राणेंसारख्या नेत्यांसोबत काम करण्याची संधी मिळणे हे भाग्याचे होते, कारण दोघांनीही वेळोवेळी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले.
अर्थसंकल्पावर पकड आणि प्रभावी भूमिका
राणेंच्या कार्यशैलीबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, त्यांची अर्थसंकल्पावरची पकड विलक्षण होती. “ते एखाद्या अर्थतज्ज्ञाप्रमाणे बजेटवर भाष्य करायचे.” युती सरकारच्या काळात काँग्रेसने काढलेल्या श्वेतपत्रिकेला उत्तर म्हणून राणेंनी ‘भगवी पत्रिका’ मांडून सरकारची प्रभावी बाजू मांडली होती, याचीही त्यांनी आठवण करून दिली.
राजकीय दरारा आणि वारसा
विधानसभेत राणेंचा मोठा प्रभाव होता. विरोधी पक्षात असतानाही त्यांच्या नेतृत्वामुळे सरकारवर आक्रमकपणे टीका करता येत होती, असे फडणवीस म्हणाले. त्यांच्या दिलदार स्वभावाबद्दल बोलताना त्यांनी पु. ल. देशपांडे यांच्या उक्तीचा उल्लेख करत सांगितले की, “कोकणातील माणूस बाहेरून कठोर आणि आतून गोड असतो, हे वर्णन राणेंना अगदी तंतोतंत लागू पडते.”
कुटुंबाचा भक्कम पाठिंबा
फडणवीस यांनी राणेंच्या कुटुंबीयांचाही विशेष उल्लेख केला. त्यांच्या पत्नी नीलम राणे यांचा त्यांना नेहमीच मजबूत पाठिंबा मिळाला आहे. तसेच त्यांचे पुत्र नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यामध्ये त्यांचा राजकीय वारसा स्पष्ट दिसून येतो, असे त्यांनी सांगितले.
कोकणाशी नाळ जुळलेला नेता
राणेंनी कोकणाच्या विकासासाठी मोठे योगदान दिल्याचे सांगत फडणवीस म्हणाले, “ते देश आणि राज्याचे नेते असले तरी त्यांच्या हृदयात कोकण आहे.” राणेंचे नेतृत्व पुढेही राज्याला मार्गदर्शक ठरेल आणि त्यांचा 100 वा वाढदिवसही अशाच उत्साहात साजरा केला जाईल.





