Junnar Knife Attack – पैसे व्यवहारातून दिलेले चेक बाऊन्स झाल्याने न्यायालयात खटला दाखल केल्याच्या रागातून एका ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर चाकूने हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना ९ एप्रिल रोजी सायंकाळी जुन्नर तालुक्यातील पाबळवाडी सावरगाव येथे घडली. या प्रकरणी बाजीराव पाबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जुन्नर पोलिसांनी ऋषिकेश काळूराम भगत (रा. खानापूर) याला अटक केली. त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की, बाजीराव पाबळे यांनी ऋषिकेश भगत याला काही रक्कम दिली होती. त्या बदल्यात भगतने दिलेले चेक बँखेत बाऊन्स झाल्यामुळे पाबळे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. याच रागातून आरोपी भगतने पाबळे यांना वारंवार धमकावले होते. गुरुवारी सायंकाळी पाबळे हे आपल्या दुचाकीवरून दूध आणण्यासाठी जात असताना, भगतने त्यांच्यावर दगड फेकला. दगड डोक्याला लागल्याने पाबळे थांबले असता, आरोपीने पुन्हा दगड मारून त्यांना जखमी केले आणि स्वतःजवळील चाकू काढून त्यांच्या शरीरावर गंभीर वार केले. या जीवघेण्या हल्ल्यात बाजीराव पाबळे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी जुन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप मोरे करत आहेत. न्यायालयात दाद मागितल्याच्या कारणावरून झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.