रत्नागिरी : ही दोन भावांची अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड असून ते दोघेही स्वार्थासाठी एकत्र येत आहेत. दोन भाऊ एकत्र येणार असतील तर एवढा गवगवा का? एकमेकांना घरी बोलवा, जेवा, मिठ्या मारा. पण मराठीसाठी एकत्र येतायत असे भासवण्याचे कारण काय? काय केले दोघांनी मराठीसाठी? मराठी तरुणांच्या नोकरी – रोजगाराच्या प्रश्नावर काय केले यांनी? हिंदी भाषा लादण्याच्या निर्णयाला कोणाची सही आहे? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच त्यांनी हा निर्णय रद्द का नाही केला, असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित करताना दोन्ही ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीवेळी नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे हे त्यांच्या रत्नागिरी–सिंधुदुर्गमध्ये प्रचारसभा घेतली होती. मात्र, आता मराठीच्या मुद्द्यावरुन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर नारायण राणे यांनी आपल्या पक्षाच्या बाजूने उभे राहत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर नेहमीच्या शैलीत टीकेची तोफ डागली आहे. ते गुरुवारी मुंबईत रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. घरगुती भांडणं चव्हाट्यावर आणणे योग्य नाही. राज ठाकरे यांनीच त्यावर बोलावे. उद्धव ठाकरेंनी त्यांना शिवसेनेत राहणे असहाय्य्य केले होते. राज यांचा एकही निर्णय मान्य केला जात नव्हता. उद्धव ठाकरेंसोबत आज कोणीही नाही. दोन भाऊ एकत्र आले, तर मला शब्दात सांगता येत नाही इतका आनंद होतोय. किती टक्के मराठी माणूस मुंबईत राहिलाय? यासाठी जबादार कोण? हे सोयीचे, फायद्याचे आणि परिवाराच्या स्वार्थाचे राजकारण आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली. राजच्या हाताशी काही लागणार नाही… भाजपला दोन्ही भावांच्या एकत्र येण्याणे काहीच फरक पडणार नाही. आम्ही मराठी नाही का? आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त मराठी माणसासाठी काम केले आहे. मला उद्धव ठाकरेंचा एकही चांगला गुण मला माहिती नाही. पण, राज ठाकरेंचा स्वभाव रोखठोक आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अडीच वर्षात सत्ता आणि हिंदुत्व दोन्ही गमावले. राज ठाकरे चुकतायत की नाही, हा माझा प्रश्न नाही, मात्र काही हाताशी लागणार नाही.