Newasa News : खोके – बोक्यांचा आरोप करणाऱ्यांनीच खोके घेवून मंत्रीपदे बहाल केली; खा. संदिपान भुमरेंचा उद्धव ठाकरेंवर आरोप

नेवासा : छत्रपती संभाजीनगरचे शिवसेना खासदार संदिपान भुमरे यांनी शिरसगांव (ता. नेवासा) येथे बुधवारी (दि. २) आयोजित आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. “आमचे पहिले मुख्यमंत्री केवळ ऑनलाइन दिसायचे, त्यांनी आमच्याशी कधी संवाद साधलाच नाही. त्यामुळे आम्हाला उठाव करावा लागला. आमच्यावर खोके-बोकेगटचा आरोप झाला, पण आम्ही शिवसेनेशी प्रामाणिक राहून झेंडे हातात धरले, केसेस अंगावर घेतल्या. मात्र, सत्ता आल्यावर आम्हाला मंत्रिपद देण्याऐवजी खोके बहाद्दरांना मंत्रिपदे देण्यात आली,” अशी खोचक टीका भुमरे यांनी केली. त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मंत्रिपदाचा सत्कारणी उपयोग केल्याचे सांगत समाधान व्यक्त केले.
या सोहळ्याला माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, माजी आमदार पांडुरंग अभंग, पंचगंगा उद्योग समूहाचे प्रभाकर (काका) शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, किसनराव गडाख, सचिन देसरडा, सुरेश डिके, अंकुशराव काळे, अॅड. स्नेहल चव्हाण-घाडगेपाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. खासदार भुमरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठे केल्याचे सांगत, आमदार लंघे यांना विखे कुटुंबाची भक्कम साथ असल्याने त्यांना लवकरच मंत्रिपद मिळेल, असा आशावाद व्यक्त केला. उपस्थितांनी टाळ्यांनी त्याला दाद दिली.
डॉ. सुजय विखे-पाटील यांनी विठ्ठलराव लंघे यांनी राजकीय संधी सोडून दुसऱ्यांना संधी दिल्याचे सांगत, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. “काहींनी लंघे यांना पाडण्यासाठी सुपारी घेऊन निवडणूक लढवली, पण जनतेने लंघे यांना निवडून आमदार केले,” असे ते म्हणाले. लंघे यांच्यासारखा सर्वसामान्यांशी जोडलेला नेता दुर्मीळ असल्याचे त्यांनी नमूद केले.
सत्काराला उत्तर देताना आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील म्हणाले, “माझा स्वभाव कधीही बदलेल नाही. सर्वसामान्य जनतेमुळे आणि माझ्या लाडक्या बहिणींमुळे मला ही संधी मिळाली. मी जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर राहीन. आता मला भेटण्यासाठी सात पडदे ओलांडावे लागणार नाहीत, तुम्ही मला कधीही भेटू शकता.” त्यांनी शैनेश्वर देवस्थानच्या अॅप घोटाळ्याबाबत विधानसभेत आवाज उठवून घोटाळेबाजांचे बुरखे फाडण्याची भूमिका स्पष्ट केली.
याच दिवशी सकाळी १० वाजता नेवासा येथील शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन खासदार संदिपान भुमरे आणि डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर हा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




