नांदगावकर २४ वर्षानंतर सेना भवनात; पायरीवर नतमस्तक, डोळे पाणावले

मुंबई : मनसे नेते बाळा नांदगावकर हे तब्बल २४ वर्षानंतर शिवसेना भवनात पोहोचले होते. यानिमित्ताने त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील आठवणींना उजाळा मिळाला. यावेळी,बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. शिवसेना भवनात येताच त्यांनी पायरीवर डोके टेकवत दर्शन घेतले. तसेच, दोन भाऊसुद्धा शिवसेना भवनात आपल्याला एकत्र पाहायला मिळतील, असेही त्यांनी म्हटले आहे.
या सेना भवनाच्या अनेक आठवणी आहेत, राजकारणाचे धडे या वास्तूत आम्ही घेतले. त्यामुळे मी पायरीच्या पाया पडलो आणि आतमध्ये प्रवेश केला. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या अनेक आठवणी या भवनात आहेत आणि त्यामुळे मी भावनिक झालो. दोन भाऊ एकत्र यावे, यासाठी मी प्रयत्न करत होतो आणि प्रत्येकवेळा ते बोलायचो.
त्यामुळे, दीपोत्सवावेळेस दोन भाऊ एकत्र आले आणि त्या दोघांनी मला पुष्पगुच्छ दिला, असे सांगताना बाळा नांदगावकर भावूक झाले होते. आज सेना भवनांमध्ये पुन्हा एकदा मला पत्रकार परिषदेसाठी स्वतः राज ठाकरे यांनी जायला सांगितले होते. त्यामुळे आम्ही सगळे नेते सेना भवनात आलो. ज्याप्रमाणे मी सेना भवनात आलो, तसेच दोन भाऊ सुद्धा सेना भवनात आपल्याला एकत्र पाहायला मिळतील, असा आशावाद नांदगावकर यांनी व्यक्त केला आहे.




