Mumbai Municipal Corporation : मुंबई महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडीनंतर महापालिकेत असणाऱ्या समित्यांवरील सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. समित्यांमधील नियुक्तीमधून राजकीय समतोल साधतानाच पक्षांतर्गत समीकरणे आणि नातेवाईकांना दिलेल्या संधीची चर्चा रंगली आहे. मुंबई महापालिकेत शिक्षण, स्थायी, सुधार आणि बेस्ट या चार महत्त्वाच्या समित्या मानल्या जातात. या समित्यांचे वाटप करताना राजकीय समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा) पक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष या दोन्ही गटांनी एकत्र येत संयुक्त गट स्थापन केला होता. या नियुक्त्यांमध्ये या पक्षातील नगरसेवकांची देखील वर्णी लागली आहे. उबाठामधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकर यांची सुधार समितीवर निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या राखी जाधव यांची स्थायी समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले चंदन शर्मा यांची देखील सुधार समितीवर वर्णी लागली आहे. या निवडीवरून पक्षांतर केलेल्यांना समित्यांवर संधी देण्यात आल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई महापौरपदाच्या शर्यतीत अनेकांची नावे चर्चेत होती. त्यापैकी एक नाव राजेश्री शिरवडकर यांचे देखील होते. त्यांना शिक्षण समितीवर स्थान देण्यात आले आहे. याशिवाय बड्या नेत्यांच्या नातेवाईकांनाही समित्यांवर संधी मिळाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर आणि विधानपरिषद आमदार प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर यांना स्थायी समितीवर पाठवण्यात आले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे मिळून चार नगरसेवक महापालिकेत आहेत. त्यांनाही विविध महत्त्वाच्या समित्यांवर संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या डॉ. सईदा खान यांची स्थायी समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे अजित रावराणे यांना सुधार समितीवर पाठवण्यात आले आहे. मुंबई महापालिकेत सत्ताधारी समीकरण अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये समन्वय साधत निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आगामी काळात समित्यांमधील कामकाज आणि निर्णयप्रक्रियेवर प्रभाग दिसून येईल. हेही वाचा : Satara News : शिवजयंतीला निघणार भव्य ‘मेगा पदयात्रा’; जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची मोठी घोषणा