मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीच्या प्रचाराला अधिकृत सुरुवात झाली असतानाच, दहिसर विधानसभा (Tejasvee Ghosalkar) मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २ हा विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रभागात एकेकाळी जवळच्या मैत्रिणी असलेल्या तेजस्वी घोसाळकर आणि धनश्री कोलगे यांच्यात आता थेट राजकीय सामना रंगणार आहे. भाजपने तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी दिली आहे, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कडून धनश्री कोलगे रिंगणात उतरल्या आहेत. धनश्री कोलगे यांनी या लढतीला “निष्ठावंत विरुद्ध गद्दार”, “टीव्हीवरील चेहरा विरुद्ध रस्त्यावर काम करणारा चेहरा” आणि “बाहेरची उमेदवार विरुद्ध स्थानिक उमेदवार” असे वर्णन केले आहे. त्या म्हणाल्या, “मी गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागात सक्रियपणे काम करत आहे. नागरिकांशी माझा थेट संपर्क आहे आणि स्थानिक प्रश्नांची मला जाण आहे.” धनश्री यांनी आपली उमेदवारी स्थानिक निष्ठा आणि विकासकामांवर आधारित असल्याचा दावा केला. दुसरीकडे, तेजस्वी घोसाळकर या माजी आमदार आणि शिवसेना (उबाठा) नेते विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत. नुकताच त्यांनी शिवसेना (उबाठा) सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. घोसाळकर कुटुंबीयांचा दहिसर भागात मोठा प्रभाव आहे, त्यामुळे हा मुद्दा निवडणुकीत चर्चेत राहिला आहे. मात्र, धनश्री कोलगे यांनी यावर स्पष्ट केले की, “तेजस्वी घोसाळकर या घोसाळकर कुटुंबातील सदस्य असल्या तरी माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. त्यांनी कधीही आमच्यावर अविश्वास दाखवलेला नाही.” एका वृत्तवाहिनीशी बोलताना धनश्री कोलगे यांनी निवडणुकीत व्यक्तिगत आरोपांपेक्षा कार्य, निष्ठा आणि स्थानिक प्रश्नांना प्राधान्य असल्याचे सांगितले. प्रभाग २ मधील विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते, मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडवण्यावरच ही लढत केंद्रित राहील, असे त्यांनी नमूद केले. प्रचाराला सुरुवात होताच दोन्ही उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. एकेकाळी मैत्री असलेल्या या दोघींमधील ही राजकीय टक्कर आता थेट संघर्षात बदलली असून, दहिसर प्रभाग २ मधील निवडणूक अत्यंत चुरशीची आणि रोचक होण्याची चिन्हे दिसत आहेत. १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या या निवडणुकीकडे संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले आहे.