Satara News : शिवजयंतीला निघणार भव्य ‘मेगा पदयात्रा’; जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची मोठी घोषणा
Satara News : जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक संपन्न; प्रत्येक विभागाला सोपवल्या विशेष जबाबदाऱ्या, चोख बंदोबस्त आणि स्वच्छतेवर राहाणार भर.

Satara News – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधुन 19 फेब्रुवारी रोजी माय भारत (मेरा युवा भारत ) मेगा पदयात्रा राज्यभरात आयोजित करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाचा मुख्य कार्यक्रम सातारा येथे होणार आहे. या पदयात्रेत जिल्हाभरातून दहा हजाराहून अधिक नागरिक, विद्यार्थी, खेळाडू, कलाकार सहभागी होणार आहेत.
याचे काटेकोर नियोजन करण्यात येत असून प्रत्येक विभागाला देण्यात आलेल्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या योग्यतरीने पार पाडाव्यात आणि ही मेगा यात्रा यशस्वी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात माय भारत मेगा पदयात्रा आयोजनाबाबत जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, माय भारत, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार राज्य निर्देशक कालिदास घाटवळ, जिल्हा युवा अधिकारी स्वप्निल देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी म्हणजे 19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मेगा पदयात्रेत 10 दहा हजाराहून अधिक सहभागी होणार आहेत त्यांनी माय भारत पोर्टलवर नोंदणी करावी, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, तरुण पिढीला शिवाजी महाराजांचा वैचारिक आणि शौर्याचा वारसा कळावा व ही पिढी त्यांच्या कार्याशी जोडली जावी, यासाठी या पदयात्रेचे आयोजन करण्यात येत आहे.
चोख व्यवस्था ठेवण्याचे निर्देश
मेगा पदयात्रा मार्गावरील चौकांमध्ये साऊंड सिस्टीम लावावी यावरुन शिवकालीन पोवाडे वाजविण्यात यावे व सातारा शहर हे सकाळीपासूनच शिवमय करावे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची पोलीस विभागाने खबरदारी घ्यावी. तसेच मेगा पदयात्रेतील मुला, मुली व नागरिकांसाठी पाण्याची व अल्पपोहराची व्यवस्था करावी.
पद यात्रा मार्ग स्वच्छ करावा कुठल्याही प्रकाराचा कचरा मार्गावर दिसणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पदयात्रा मार्गावर रुग्णवाहिका तैनात ठेवावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिले.
शिवकालीन सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करा
एनसीसी व एनएनएस चे विद्यार्थी ड्रोसकोडमध्ये मेगा पदयात्रेत सहभागी होतील याबाबत महाविद्यालयांना कळविण्यात यावे. मेगा पदयात्रा निघाल्यानंतर चौकाचौकात शिवकालीन कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे. वातावरण निर्मितीसाठी सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करावे.





