Bihar Election : बिहारमध्ये २३ लाख महिला मतदारांची नावे वगळली; कॉंग्रेसचा मोठा दावा

Bihar – बिहारमधील अंतिम मतदार याद्यांवरील आक्षेपांचे सत्र कॉंग्रेसने कायम ठेवले. त्या राज्यातील सुमारे २३ लाख महिला मतदारांची नावे वगळण्यात आली. ते प्रमाण ५९ विधानसभा मतदारसंघांमध्ये लक्षणीय स्वरूपाचे आहे, असा दावा त्या पक्षाने केला.
महिला कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा यांनी रविवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी कॉंग्रेसकडून केल्या जात असलेल्या मतचोरीच्या आरोपांचा पुनरूच्चार केला.
मतदार याद्यांमधून नावे वगळण्यात आलेल्या महिला आता बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीत मतदार करू शकणार नाहीत. ती घडामोड राज्यघटना विरोधी आहे. प्रामुख्याने बिहारच्या ६ जिल्ह्यांमधून सर्वांधिक महिला मतदारांची नावे वगळण्यात आली.
गोपालगंज, भोजपूर, पूर्णिया, बेगुसराय, समस्तीपूर आणि सारण हे ते जिल्हे आहेत. त्या जिल्ह्यांमधील २५ जागांवर मागील विधानसभा निवडणुकीत (वर्ष २०२०) सध्या इंडिया आघाडीचे घटक असणाऱ्या पक्षांनी विजय मिळवला.
तर, ३४ जागा सत्ताधारी एनडीएने जिंकल्या. मात्र, एनडीएचा विजय झालेल्या त्या बहुतांश जागी अटीतटीच्या लढती झाल्या. त्या मतदारसंघांमध्ये मतदार याद्या पडताळणीच्या नावाखाली निवडणूक आयोगाने मोठी लबाडी केल्याचे दिसते, असा आरोप त्यांनी केला.
नावे वगळण्यात आलेल्या महिला मतदारांनी मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत मतदान केले. त्यांची मते बनावट होती का? बनावट मतांच्या आधारे निवडलेल्या खासदारांच्या जोरावर सरकार स्थापन झाले का, अशा प्रश्नांची सरबत्तीही त्यांनी केली.





