Nahid Wins Gold : जम्मू-काश्मीरच्या पठ्ठ्याची ऐतिहासिक कामगिरी! वर्ल्ड आर्निस चॅम्पियनशिपमध्ये जिंकले २ सुवर्ण अन् १ कांस्य पदक
Nahid Wins Gold : जम्मू-काश्मीरच्या नाहिद अली चौधरीने दमदार कामगिरी करत तब्बल दोन सुवर्ण आणि एक कांस्य पदक देशाच्या झोळीत टाकले आहे.

Nahid Ali Choudhary Wins Two Gold Medals 18th World Arnis Championship : जम्मू-काश्मीरच्या एका गुणी खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रीडा मंचावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला आहे. ‘वर्ल्ड एस्क्रीमा काली आर्निस फेडरेशन’ (WEKAF) द्वारे आयोजित करण्यात आलेल्या ११८ व्या वर्ल्ड आर्निस चॅम्पियनशिपमध्ये जम्मू-काश्मीरच्या नाहिद अली चौधरी (Nahid Ali Choudhary) याने अद्भूत कामगिरी करत तब्बल दोन सुवर्ण (Gold) आणि एक कांस्य (Bronze) पदक देशाच्या झोळीत टाकले आहे.
अमेरिका, फिलीपीन्सच्या खेळाडूंना चारली धूळ –
नाहिद अली चौधरीने या जागतिक स्पर्धेत तीन वेगवेगळ्या प्रकारांत (Events) भारताचे प्रतिनिधित्व केले होते. आपल्या अनुभवाचा आणि कौशल्याचा वापर करत त्याने पहिल्या प्रकारात फिलीपीन्स, अमेरिका आणि थायलंडसारख्या बलाढ्य देशांच्या खेळाडूंना पराभवाची धूळ चारली. दुसऱ्या आणि तिसऱ्या इव्हेंटमध्येही आपला आक्रमक फॉर्म कायम ठेवत त्याने २ सुवर्ण आणि १ कांस्य पदकावर नाव कोरले. या ऐतिहासिक यशाचे श्रेय नाहिदने त्याचे आई-वडील आणि कोच अमन वर्मा यांना दिले आहे.
“वडील सीमेवर देशाचे रक्षण करतायत, तर मुलगा…”; आई झाली भावुक!
नाहिदची आई निशाद बीवी यांनी मुलाच्या या यशावर अत्यंत भावुक होत सांगितले की, “मला नाहिदचा प्रचंड अभिमान आहे. तो लहानपणापासूनच खेळात हुशार होता. एकीकडे त्याचे वडील लष्करात राहून सीमेवर देशाची सेवा करत आहेत, तर दुसरीकडे माझा मुलगा खेळाच्या मैदानात पदके जिंकून तिरंग्याचा मान वाढवत आहे.” नाहिदचा मोठा भाऊ हमीद चौधरी यानेही हा संपूर्ण गाव आणि राज्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले.
या यशानंतर नाहिदने तरुणांना अंमली पदार्थांच्या (Drugs) विळख्यापासून दूर राहून खेळाकडे वळण्याचा मोलाचा संदेश दिला. ‘आर्निस’ हा मार्शल आर्ट्सशी संबंधित खेळ असून, यामध्ये लाठी, काठी, चाकू आणि विनाहत्यार स्वसंरक्षण करण्याच्या तंत्रांचे प्रदर्शन केले जाते.





