Nagpur Accident : नागपुरात तिहेरी अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, जखमीची प्रकृती चिंताजनक

नागपूर : नागपूरमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. नागपूरच्या नवीन कटोल नाका टोल प्लाझाजवळ कालमेश्वर रोडवर स्कुटी, ट्रक आणि मिनी टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात इतका भयंकर होता की टेम्पोचा चक्काचूर झाला.
या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत केली. जखमींना बाहेर काढले आणि जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रोशन टेकाम, रमेश देहनकर आणि रामकृष्ण मसराम अशी अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अपघात झालेले मालवाहू चार चाकीवाहन रविवारी संध्याकाळी कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत कृषी उपज पोहोचून परत काटोलच्या दिशेने जात होते. कालमेश्वरहून नागपूरकडे जाणारी स्कूटी समोरून येणाऱ्या टेम्पोला जोरात धडकली. यानंतर मिनी ट्रक आणि नवीन कटोल नाक्याकडून येणाऱ्या ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली.
या अपघातात स्कूटीवरील दोन आणि मिनी ट्रकमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, जखमी व्यक्तींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती तेथील डॉक्टरांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
पोलादपूरजवळ अज्ञात ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील महाड ते पोलादपूर दरम्यान महाड औद्योगिक वसाहतीतून रात्रपाळीची नोकरी करुन लिफ्ट मागून मोटारसायकलवरून परत येताना अज्ञात ट्रकच्या धडकेत मोटारसायकलवर मागील बाजूस बसलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. यावेळी धडक देऊन ट्रकचालक पसार झाला.
वैभव रमेश पालकर असं अपघतात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची माहिती समजतात पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.




